esakal | विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

akhada Balapur police

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत ८४ गावे असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे गावकऱ्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यापूढे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई

sakal_logo
By
विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाणे अंतर्गत विविध गावांमधून विनाकारण फिरणाऱ्या गावकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी दिला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मदत होणार आहे.

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत ८४ गावे असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे गावकऱ्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानंतरही काही ठिकाणी गावकरी घराच्या बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाआड दुकाने उघडी राहणार असल्याच्या सूचना पोलिस विभागाने दिल्या आहेत. 

हेही वाचाहिंगोलीकरांना घरपोच मिळणार भाजीपाला

ग्रामस्थ गावी परतले

सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच ग्राहकांनी किराणा सामान व भाजीपाला खरेदी करावयाचा आहे. त्यानंतर कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी केले आहे. तसेच ग्राहकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन जादा दराने धान्य व भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक यासह इतर मोठ्या शहरांत कामानिमित्त गेलेले ग्रामस्थ गावी परतले आहेत. 

हिवरा फाटा या ठिकाणी चेक पोस्ट

असे ग्रामस्थ, नागरिक घराच्या बाहेर पडलेले दिसल्यास किंवा त्या बाबतची तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिवरा फाटा या ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस उपाधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, हनुमंत नखाते पाटील, जमादार संजय मार्के, प्रभाकर भोंग, गजानन भालेराव, भगवान वडकिले यांच्यासह पोलिस कर्मचारी खडा पहारा देत आहेत.

येथे क्लिक करागरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
 
नागरिकांची आरोग्य तपासणी

नागरिकांच्या आरोग्यासाठी महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. अनेक गावांमधून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून बाहेरगावांवरून येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांनीही पोलिस, महसूल व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी केले आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज


आखाडा बाळापूर येथे दिवसाआड भरणाऱ्या भाजीपाला, किराणा दुकानावर ग्रामस्थ गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याकडे लक्ष देवून सोशल डिस्टन्सचा प्रयोग येथे राबवावा, अशी मागणी होत आहे.