esakal | हिंगोलीकरांना घरपोच मिळणार भाजीपाला 
sakal

बोलून बातमी शोधा

bhajipala

शेतात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर असल्याने त्‍याची नियमित विक्री करणे गरजेचे आहे. अन्यथा तो खराब होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी हिंगोली शहरात घरपोच भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला. व्हाट्सअप ग्रुपमध्ये या बाबतची माहिती दिली. त्यामुळे आता भरपूर ऑर्डर येण्यास सुरवात झाली आहे.

हिंगोलीकरांना घरपोच मिळणार भाजीपाला 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एक दिवसाआड भाजीपाल्याची सकाळी दहा ते एक या वेळात विक्री होत आहे. मात्र नियमित भाजीपाला विक्री करणाऱ्यांचा भाजीपाला शिल्‍लक राहत असल्याने तो परत न्यावा लागत आहे. यामुळे काही उत्‍पादक शेतकऱ्यांनी घरपोच भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला असून ते आता एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घरपोच भाजीपाल्याची विक्री करणार आहेत. 

मागच्या काही दिवसापासून शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. त्‍याचे पालन देखील नागरिक करीत आहेत. शहरात जीवनावश्यक वस्‍तुची विक्री सकाळी दहा ते दुपारी एक या वेळात केली जात आहे. तर दिवसाआड भाजीपाला विक्री होत आहे. शहरातील मुख्य भाजीमंडई बंद करण्यात आली असून इतर आठ ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. शहरात दररोज ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रीसाठी येतो. 

हेही वाचारेल्‍वे रुळाने पायी चालत राजस्‍थानी मजूरांचा प्रवास

भाजीपाला विक्रीसाठी मिळताहेत तीन तास

यातील काही जण अकोला बायपास, खटकाळी बायपास, एसआरपी कॅंप यासह इतर ठिकाणी बसून भाजीपाल्याची विक्री करतात. दरम्‍यान, तालुक्‍यातील इडोळी येथील संतोष टेकाळे, उमेश साबळे, वनदेव जाधव, अगंद जाधव हे हिंगोली शहरात नियमित एका ठिकाणी बसून भाजीपाल्याची विक्री करीत होते. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे त्‍यांना एक दिवसाआड भरणाऱ्या बाजारात बसावे लागत आहेत. ते देखील तीन तास यामुळे त्‍यांच्याकडे असलेल्या संपूर्ण भाजीपाल्याची विक्री होईनासी झाली आहे. 

नैसर्गीक व सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड

या शेतकऱ्याकडे प्रत्‍येकी एक एकरात नैसर्गीक व सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. यात मिरची, टोमॅटो, भेंडी, पालक, मेथी, कोथींबीर, पातीचे कांदे, काकडी, वागे, गांजर, शेवगा, लिंबू, चवळी, कोबी, आदींचा समावेश आहे. शेतात भाजीपाला मोठ्या प्रमाणावर असल्याने त्‍याची नियमित विक्री करणे गरजेचे आहे. अन्यथा तो खराब होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे या शेतकऱ्यांनी हिंगोली शहरात घरपोच भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला. 

येथे क्लिक कराकांदा बीजोत्‍पादनाला अवकाळीचा फटका

व्हाट्सअप ग्रुपमध्ये माहिती

याची माहिती त्‍यांनी शहरातील अण्णा जगताप यांना दिली. त्‍यांनी या बाबत मार्गदर्शन करून अनेक जणांचे फोन नंबर देखील दिले. तसेच अण्णा जगताप यांच्या एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये त्‍यांना ॲड करत ग्रुपमध्ये या बाबतची माहिती दिली. यामुळे आता त्‍यांच्याकडे भरपुर ऑर्डर येण्यास सुरवात झाली असून ते तिघेही हिंगोली शहरात घरपोच भाजीपाला पुरवणार आहेत. या शेतकरी ते ग्राहक असा सरळ भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. 


मिळालेल्या ऑर्डरप्रमाणे विक्री करणार

वडीलोपार्जित तीन एकर शेती आहे. त्‍यापैकी एका एकरात भाजीपाल्याची लागवड केली असून नियिमत विक्री करतो. मात्र काही दिवसांपासून संचारबंदी सुरू असल्याने एक दिवसाआड भरणाऱ्या बाजारात त्‍याची विक्री करावी लागत आहे. यासाठी तीन तासाचा अवधी आहे. यामुळे विक्रीस आणलेल्या संपूर्ण भाजीपाला विकण्यास अडचणी येत आहेत. आता घरपोच भाजी विक्रीचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्अप ग्रुपमध्ये मिळालेल्या ऑर्डरप्रमाणे त्‍याची विक्री करणार आहे. 
- संतोष टेकाळे, भाजीपाला उत्‍पादक, इडोळी

loading image