esakal | RT-PCR टेस्टसाठी जास्त पैसे घेणे पडले महागात; लातुरात दोन लॅबवर कारवाई

बोलून बातमी शोधा

covid 19 test

RT-PCR टेस्टसाठी जास्त पैसे घेणे पडले महागात; लातुरात दोन लॅबवर कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: कोरोना रुग्णांच्या आरटीसीपीसीआर टेस्टसाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. या दरापेक्षाही खासगी लॅब चालकाकडून जास्तीचे पैसे घेऊन रुग्णाची लूट केली जात आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी (ता. ३०) येथील दोन लॅबवर छापा टाकला. तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकात एक प्रकारचे भीतीचे वातावरण आहे. सर्दी, खोकला, ताप असेल तर नागरिक तातडीने अँटीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करून घेत आहेत. रुग्णालयात दाखवण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टर देखील अशा टेस्ट करण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे सध्या लॅब चालकांना महत्त्व आले आहे. आरटीपीसीआर टेस्टसाठी शासनाने दर ठरवून दिलेले आहेत. पण, सध्या येथील काही लॅब चालकांकडून सर्रास जास्तीचे पैसे घेऊन रुग्णाची लूट केली जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी (ता. ३०) येथे उघडकीस आला आहे.

हेही वाचा: लातुरात पुन्हा ‘रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार, पाच जणांना अटक

येथील मिनी मार्केट परिसरात असलेल्या न्यू व्यंकटेश लॅब व सिग्नल कॅम्प भागात असलेल्या व्यंकटेश लॅब येथे महापालिकेच्या पथकाने छापा टाकला. या दोनही ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टसाठी जास्तीचे पैसे घेत असल्याचे उघडकीस आले आहेत. तेथील रजिस्टरच्या नोंदी, संगणकावरच्या नोंदीही महापालिकेच्या पथकाने तपासल्या. यात जास्तीचे पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर यात एका लॅबला दहा हजार व एका लॅबला नऊ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी दिली. यापुढेही असे प्रकार आढळून आल्यास अशी कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.

हेही वाचा: औरंगाबाद - नगर रोडवर धावत्या कारला आग ; आगीत कार जळून खाक

पैसे परत करा

ज्या रुग्णांकडून आरटीपीसीआरसाठी जास्तीचे पैसे घेतले आहेत, अशा रुग्णांना जास्तीचे पैसे परत देण्याच्या सूचना या लॅब चालकांना देण्यात आल्या आहेत. पैसे परत केल्याच्या पावत्या दाखवण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी यांनी दिली.