तरुणाईला ग्रासले लाईक्‍स, कमेंट्‌स अन्‌ स्टेटसने

मनोज साखरे
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

आभासी जीवनामुळे तरुणाईचे भविष्य धोक्‍यात 

औरंगाबाद - सोशल मीडियामुळे जग जवळ आले. दुरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला; पण जवळचा दुरावत आहे. कमेंट, व्ह्युव्हज, स्टेटस, लाईक्‍सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्‍स, कमेंट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे. खासकरून तरुणाई या गर्तेत अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह उज्ज्वल भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत. 

साधारणत: तीन बाय सहा इंचच्या मोबाईल डिस्प्लेवर अख्खे विश्‍व, संपर्क व माहितीचे जाळे आता सहज उपलब्ध आहे. सोशल मीडियामुळे  क्रांती झाली असली तरी हल्ली असंख्यजण त्यातच आकंठ बुडाल्याचे चित्र आहे. ही बाब मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या मोबाईल वापरकर्ते रुग्णांच्या संख्येवरुन दिसुन येते. बहुतांश युजर्संचा सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल दिसतो. ज्या वयात सकारात्मक विचारांच्या पेरणीची गरज असते. त्या वयात नकारात्मक भावना, चिंता वाढून सहनशिलता क्षीण होण्याची भिती सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे वाढते. युजर्सने एखादी पोस्ट टाकली तर त्यावर सोशल मीडियात कमेंट, लाईक्‍स याला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी. इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे ही धडपड तरुणाईत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा शॉर्टकट घेतले जात आहेत; परंतु कमी लाईक्‍स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त मिळाल्या तर त्याच विश्‍वात गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, ऐकलकोंडेपण, निराशा असे परिणाम वाढत असून, ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

असेही एक जग 
त्याची व तिची  फेसबुकवर ओळख झाली. नंतर संपर्क वाढला. प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ती स्वप्नात जगत होती. ती त्याचाच विचार करीत होती. तिच्याशी त्याने शरीरसंबंधही प्रस्तापित केले; परंतु प्रत्यक्षात मात्र तिला ऐनवेळी दगाफटका दिला आणि तिचे स्वप्न उद्‌वस्त केली. फेसलेस चॅट आणि आभासी जीवन जगण्यामुळे ही वेळ आली. 

स्टंट अन्‌ प्रसिद्धी 
टीक टॉक असो वा इंन्स्ट्राग्राम की फेसबुक या सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली तरुणाई विविध व्हिडीओ, सेल्फी अपलोड करीत आहेत. धोक्‍याच्या स्थळी जाऊन जीव आणखीनच धोक्‍यात घालून व्हिडिओ कॉलिंग, स्टंट करण्याकडे कल वाढला आहे. व्हिडिओ चित्रण करून अपलोड ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त प्रसिद्ध होऊ
अशी भावनाही युजर्संची आहे. या आभासी जगातही काहीजणांचे जीव गेल्याचे उदाहरणे आहेत. 

या जगातून बाहेर पडा 

  • र्व्हच्युअल लाईफमुळे फसवणूक, आर्थिक नुकसान, विश्‍वासघात, चिडचिड, ताण-तणाव, चिंता, एकलकोंडेपणा, निराशेत भर. 
  • वैचारिक क्षमता क्षीण होत असून समंजसपणाचाही अभाव जाणवत आहे. 
  • भविष्य अधांतरी होण्याची शक्‍यता वाढते. 
  • र्व्हच्युअल लाईफपेक्षा सोशल लाईफ जगण्याची गरज आहे. 
  • स्वमग्न नव्हे अंर्तमुख होऊन विचार करण्याची गरज आहे. 

 
काय म्हणतात तज्ज्ञ 
माणसांचा माणसांशी प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. परिणामी, व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढत आहे. सोशल मीडियात वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्‍स, कमेंट, व्ह्युव्हज या गोष्टी महत्वाच्या वाटु लागल्या आहेत. आनंद म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी असाच समज वाढत आहे. त्यातून व्यक्ती स्वत:च स्वत:चे आभासी विश्‍व तयार करुन त्यात रममान होताना दिसून
येत आहे. त्यामुळे व्यक्तींचे सातत्य राखण्याची क्षमता व सहनशिलता कमी होत जाते. 
 

कुठे खर्च करताय ऊर्जा? 
सोशल मीडियाचा वापर करताना युजर्स बऱ्याचदा चुकीच्या ठिकाणी ऊर्जा खर्च करीत आहेत. त्यातून अतार्किक विचारांना खतपाणी मिळते. उदासिनता, नैराश्‍य, चिंता वाढते. सोशल मीडियांवर इतरांच्या पोस्टला मिळणाऱ्या लाईक्‍स, कमेंट आणि व्हुव्हजशी आपण केलेल्या पोस्टशी तुलना करतो. त्यातून उदासिनता वाढते. सोशल मीडियाच्या किती आहारी जायला हवे हे बुद्धीच्या कसोटीवर घासण्याची वेळ आहे. शारीरिक, मानसिक क्षमता राखण्यासाठी काय करता येईल यावर भर दिल्यास प्रतिकार सहनशिलता वाढण्यास मदत होईल. 
- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Addiction to social media