आदिवासी आश्रमशाळेचा दिल्‍ली दरबारी झेंडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

हिंगोली  - कळमनुरी तालुक्‍यातील गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेने स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धेत देशात सतरावा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून दिल्‍ली दरबारी स्‍वच्‍छतेचा झेंडा रोवला आहे.

हिंगोली  - कळमनुरी तालुक्‍यातील गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेने स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धेत देशात सतरावा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवून दिल्‍ली दरबारी स्‍वच्‍छतेचा झेंडा रोवला आहे.

केंद्रशासनाकडून देशपातळीवर स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धा घेतली जाते. या स्‍पर्धेत मागील वर्षी कळमनुरी तालुक्‍यातील गोटेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेने सहभागी नोंदवला. आदिवासी कार्यालयाचे प्रकल्‍प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी शाळा प्रशासनाला सोबत घेत विविध उपक्रम राबवले आहेत. या शाळेची टुमदार इमारत उभी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्‍ध केल्‍या आहेत. याशिवाय शाळेत गुणवत्तेसोबत स्‍वच्‍छतेचे उपक्रम राबवले आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे दैनंदिन नियोजन देखील केले आहे. 

शाळेमध्ये अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा उभारून विद्यार्थ्यांना प्रयोगाची माहिती दिली जाते तर गणित विषयासाठी मॅथ माउटेन उपक्रम राबवला जात आहे. इंग्रजी व मराठी विषयासाठी स्‍वतंत्र विभाग स्‍थापन केलेले आहे. ज्ञान रचनावादावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. 

दरम्‍यान, केंद्र शासनाच्‍या स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धेत सहभागी झालेल्‍या या शाळेला विधीमंडळ आश्वासन समितीने भेट देवून उपक्रमाचे कौतूक केले होते. या शाळेच्‍या उपक्रमांची जिल्‍हास्‍तर, विभागस्‍तर व केंद्र शासनाच्‍या पथकाने पाहणी केली होती. त्‍यानंतर केंद्र शासनाने नुकताच 
निकाल जाहिर केला आहे. यामध्ये देशातील विविध राज्‍यातील ५२ शाळांनी यश मिळविले. यामध्ये गोटेवाडी शाळेला देशात सतरावा तर राज्‍यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. 

वरिष्ठांच्‍या मार्गदर्शनामुळे यशाला गवसणी - डॉ. विशाल राठोड, प्रकल्‍प अधिकारी
शाळेने स्‍वच्‍छ विद्यालय पुरस्‍कार स्‍पर्धेत सहभाग घेतल्‍यानंतर आदिवासी विभागाच्‍या प्रधान सचिव, आयुक्‍त व अप्‍पर आयुक्‍तांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. याशिवाय शाळा प्रशासनासोबतच विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवल्‍याने केंद्राचा पुरस्‍कार मिळू शकला आहे. आदिवासी आश्रमशाळा स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धेत देशपातळीवर यशस्‍वी झाली याचे समाधान आहे.

पंतप्रधानांच्‍या हस्‍ते होणार गौरव
स्‍वच्‍छ विद्यालय स्‍पर्धेत केंद्रात सतरावा व राज्‍यात प्रथम क्रमांक मिळाल्‍याबद्दल ता. १८ सप्‍टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते दिल्‍ली येथे पुरस्‍कार वितरण केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adivasi Ashramshala in hingoli