गोदाकाठच्या 26 गावांसाठी प्रशासन सतर्क 

पांडुरंग उगले 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नाशिक परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे पैठणचे जायकवाडी धरण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरले आहे. यामुळे कोणत्याही वेळी पाणी सोडण्याच्या शक्‍यतेमुळे प्रशासनाने माजलगाव तालुक्‍यातील गोदावरी नदीकाठच्या 26 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

माजलगाव -  नाशिक परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे पैठणचे जायकवाडी धरण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरले आहे. यामुळे कोणत्याही वेळी पाणी सोडण्याच्या शक्‍यतेमुळे प्रशासनाने तालुक्‍यातील गोदावरी नदीकाठच्या 26 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी संपूर्ण आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले. 

मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. मागील आठ दिवसांपासून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत उद्भवलेली पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाची यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील आठ दिवसांत नाशिक परिसरात पडलेल्या मोठ्या पावसामुळे मृतसाठ्यात असलेले पैठणचे जायकवाडी धरण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरले आहे. 

जायकवाडी धरणात निवारी (ता. 11) रात्रीपासून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला असून, तो 65 हजार क्‍युसेकपर्यंत गेला आहे. यामुळे लवकरच जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने कोणत्याही वेळी धरणातून गोदावरी नदीपात्र पाणी सोडले जाणार आहे. यामुळे तालुक्‍यातील गोदाकाठावर असलेल्या 26 गावांना पुराचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. याची खबरदारी घेत महसूल प्रशासन सतर्क झाले आहे. 

गावनिहाय समिती अन्‌ नोडल अधिकारीही 
तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलवून गोदाकाठच्या 26 गावांचा आढावा घेतला. पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेता गावनिहाय समिती नेमण्याच्या सूचना, सुरक्षित ठिकाणांची पाहणी, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती, तर दवंडी देऊन ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. गोरे यांनी सांगितले. 

2006 च्या पुनरावृत्तीची भीती 
2006 ला जायकवाडी धरणातून दोन लाख क्‍युसेकपेक्षा अधिक पाणी सोडल्याने गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. यावेळी तालुक्‍यातील अनेक गावांत पाणी शिरल्याने तेथील ग्रामस्थांचे स्थलांतर केले होते. यामुळे 13 वर्षांनंतर याच परस्थितीची भीती निर्माण होत आहे. 

जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने गोदावरीच्या संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता महसूल प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनेची यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. 
-
डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration alert for 26 villages of Godawari