esakal | संवेदनशील तालुक्याबाबत प्रशासन असंवेदनशील, का आणि कसे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

गेल्या तीन महिन्यांपासून पाथरीतील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलिस निरीक्षक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याचा परिणाम कामकाजावर होत असून कर्मचाऱ्यांची मनमानी वाढत आहे. 

संवेदनशील तालुक्याबाबत प्रशासन असंवेदनशील, का आणि कसे ते वाचा...

sakal_logo
By
धनंजय देशपांडे

पाथरी : गेल्या तीन महिन्यांपासून पाथरीतील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलिस निरीक्षक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याचा परिणाम कामकाजावर होत असून कर्मचाऱ्यांची मनमानी वाढत आहे. तर कोरोनाच्या वाढत्या प्रसारानंतरही जिल्हा प्रशासनाकडून पाथरी येथे पूर्ण वेळ आधिकारी दिला जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शासन दरबारी संवेदनशील तालुका अशी ओळख असलेल्या पाथरीबाबत प्रशासन असंवेदनशील असल्याचे दिसून येते. 

तालुक्याचे ठिकाण असलेल्या पाथरीत पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यासाठी उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयातील उपविभागीय अधिकारी पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी व्ही.एल.कोळी हे ११ जून ते २८ जूनपर्यंत रजेवर गेले होते. दोन दिवस कर्तव्य निभावल्यानंतर त्याच महिन्यात (ता.३०) जून रोजी श्री.कोळी हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर (ता.एक) जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय अधिकारी श्री.पारधी काही दिवसासाठी कुंडेटकर व त्यानंतर आजपर्यंत श्री.पारधी यांच्याकडे उपविभागीय कार्यालयाचा पदभार आहे.  

हेही वाचा - मुखेड खून प्रकरण : आरोपीला तेलंगणात सिनेस्टाईल अटक, कोठडी
 
तहसील कार्यालयातील कारभार विस्कळीत 
तहसीलदार यु.एन.कागणे यांची बदली झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून तहसीलदार पद रिक्त आहे. कागने यांची दोन जून रोजी बदली झाली. त्यानंतर नायब तहसीलदार कुट्टे यांच्याकडे पदभार देण्यात आला. तालुक्यातील मुख्य असलेल्या तहसील कार्यालयातील तहसीलदार पदच रिक्त असल्याने कारभार विस्कळीत झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती पोलिस ठाण्याची झाली आहे. एका वाळू प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक शिंदे यांना नियंत्रण कक्षात हलवल्यानंतर १५ मार्च रोजी पोलिस उपनिरीक्षक के.बी.बोधगिरे यांच्याकडे ठाण्याचा पदभार देण्यात आला होता. परंतू ता २५ मे रोजी आमदार बाबजानी दुराणी यांनी जमावबंदी असतांनाही सामूहिक नमाज पठण केल्या प्रकरणात पोलिस अधीक्षकांनी के.बी.बोधगिरे यांना तडकाफडकी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला हलवले. त्याच दिवशी ठाण्याचा पदभार सहायक पोलिस निरीक्षक बालाजी टिप्पलवाड यांच्याकडे देण्यात तो आजपर्यंत कायम आहे. 

हेही वाचा - पुतण्या मला वाचव... म्हणण्याची काकावर आली वेळ -

कामकाजावर होतोय परिणाम 
तालुक्यातील महत्वाच्या उपविभागीय अधिकारी दीड महिना, तहसीलदार अडीच महिना तर पोलिस निरीक्षक पद तब्बल पाच महिन्यापासून रिक्त आहेत. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने याचा परिणाम कामकाजावर होत असून कर्मचाऱ्यांची मनमानी वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पाथरीसारख्या संवेदनशील तालुक्यात सक्षमपणे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. 

संपादन : राजन मंगरुळकर