विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी

सुहास सदाव्रते
Wednesday, 11 September 2019

ज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती करण्यात येत आहे. दुसरीकडे गुरुजींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.

जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती करण्यात येत आहे. दुसरीकडे गुरुजींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी नुकतीच पाहणी केली आहे. यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था 162 पश्‍चिम, 102 बदनापूर मतदारसंघातील 81 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाकरवाडी दुर्गम भागातील केंद्र, मतदान केंद्रावर वीज, पाणी, फर्निचर पायाभूत सुविधा, बीएलओ संवाद साधत माहिती घेतली. जिह्यातील एक हजार 678 मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रांसह दोन हजार 213 कंट्रोल युनिटबाबत पूर्वतयारी करण्यात आली आहे.

ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर निवडणूक मतदान माहितीविषयक स्टिकर लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. जालना, बदनापूर, भोकरदन, अंबड, परतूर, मंठा, तीर्थपुरी, टेंभुर्णी येथील एजन्सींना जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने अंमलबजावणीसंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.

गुरुजींचा बहिष्कार
शासनाने जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास आणि गेल्या अठरा वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तातडीने अनुदान न दिल्यास जिल्ह्यातील शिक्षकांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. शिक्षकांच्या अनुदान व पेन्शनचा प्रश्‍न शासनस्तरावर का सुटू शकत नाही, असा सवाल करीत शिक्षकांचे किती बळी शासनाला हवे असा संतप्त सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. जर शिक्षकांचा प्रश्‍न सुटला नाही, तर विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार किंवा नोटा पर्याय वापरावा लागेल, अशी प्रतिक्रिया जुनी पेन्शन योजना कृती समितीचे सचिव नंदकिशोर लेखणार यांनी दिली आहे.

वीस हजार केसपेपर
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार मतदान टक्‍केवारी वाढविण्यासाठी आता जिल्ह्यातील रुग्णालये, महिला रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, तर चाळीस आरोग्य केंद्र उपकेंद्रातून बाह्यरुग्ण पत्रिकेवर मतदान जागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने 20 हजार केसपेपरच्या प्रती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्याकडे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पाठविल्या आहेत. मतदानासाठी वेळ काढा, देशाचे भाग्यविधाते व्हा, मतदारांनो, जागृत व्हा... असा संदेश देण्यात आला आहे.
----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Administration Preparation For Assembly Election