पहाटेच्या दुरध्वनीने प्रशासनाने सोडला सुटकेचा निःश्वास

file photo
file photo


हिंगोली : :ज्या दुरध्वनीसाठी रात्रभर कान आसुसले होते तो दुरध्वनी मंगळवारी (ता.पाच) पहाटे पाच वाजता आला अन् वाघ हिंगोली जिल्ह्यातून बाहेर गेल्याचा संदेश मिळताच वन विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

हिंगोली तालुक्यातील कलगाव सेनगाव तालुक्यामध्ये मागील पाच दिवसांमध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या वाघाने चार जनावरे फस्त केली. याशिवाय सेनगाव तालुक्यात दोन रोही प्राण्यांचाही फडशा पाडला. तसेच सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द शिवारामध्ये सुनील कबाडे या तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केले. या घटनेनंतर राज्यभरातील वन विभागाची यंत्रणा सतर्क झाली. शिवाय महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही परिस्थितीवर लक्ष ठेवले होते. वाघ असल्याचा निरोप येईल त्या ठिकाणी वन विभागाचे पथक अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पोहोचू लागले होते. तसेच वाघ आल्याबाबत समज-गैरसमज दूर करीत होते. गावकऱ्यांना व शेतकरी शेतमजुरांना आवश्यकता सूचनाही वनविभागाकडून दिल्या जाऊ लागल्या होत्या. 


दरम्यान, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, जयसिंग कच्छवे, शेख जमील यांचे पथक मागील पाच  दिवसांपासून दिवस-रात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सुकळी खुर्द शिवारात तरुणावर झालेल्या हल्ल्यानंतर अमरावती, नांदेड, बीड, परभणी व टिपेश्वर अभयारण्यातील पथकाने सुकळी खुर्द शिवारात धाव घेतली होती. औरंगाबाद विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी देखील सुकळी खुर्द येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. मागील पाच दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात असलेल्या वाघाचे पाचवे लोकेशन  मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या म्हाळशी या गावात दाखवण्यात आले होते. त्यामुळे हा वाघ विदर्भाकडे जात असल्याचे स्पष्ट झाले. 


दरम्यान, आज पहाटे पाच वाजता डेहरादून या संस्थेने वन विभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मागील सात ते आठ तासापासून ज्या संस्थेच्या दूरध्वनीसाठी वनविभागाचे कान आसुसले होते. त्या संस्थेने आज पहाटे पाच वाजता दूरध्वनी करून वाघ हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात गेला आहे अशी बातमी वन विभागाला दिली. पाच दिवस जिल्ह्यात मुक्काम ठोकलेल्या वाघाने हिंगोली जिल्हा सोडल्यानंतर वन विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सोमवारची रात्र अधिकाऱ्यांनी जागून काढली

सोमवारी (ता.चार) रात्री उशिरा वाघाचे लोकेशन काय मिळणार याकडे महसूल विभागासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आले होते. डेहरादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेकडून वाघावर रेडिओ कॉलरच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते. या संस्थेकडून रात्री वाघाची लोकेशन काय मिळणार याची उत्सुकताही प्रशासनाला लागली होती. डेहरादून येथील संस्थेकडून कुठल्याही क्षणी संपर्क साधून माहिती मिळू शकते यामुळे महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारची रात्र जागून काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com