esakal | कोरोनाच्या संकटानंतर आता गारपीटीचे संकट...कोठे वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

हिंगोली जिल्हाभरात मंगळवारी सकाळपासून काही भागात हवा व ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास वसमत तालुक्‍यातील कुरुंदा परिसरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. 

कोरोनाच्या संकटानंतर आता गारपीटीचे संकट...कोठे वाचा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत तालुक्‍यातील गिरगाव, कुरुंदा परिसरात मंगळवारी (ता. २८) दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वीस मिनिटे गारांचा पाऊस झाला. या पावसाने आंबा पिकांसह केळीचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. मंगळवारी सकाळपासून काही भागात हवा व ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास वसमत तालुक्‍यातील गिरगावसह परजना, खाजमापूरवाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्डी बुद्रुक, डिग्रस खुर्द, कुरुंदा, कुरुंदवाडी, डोणवाडा, कोठारी, कोठारवाडी, पिंपराळा, दाभडी आदी भागांत वीस मिनिटे गारांचा पाऊस झाला. 

हेही वाचाहिंगोलीत पाच वर्षीय बालकाला कोरोनाची लागन

या पावसाने केळी, टरबूज, हळद पिकांना फटका बसला असून आंब्याचेदेखील नुकसान झाले आहे. दरम्‍यान, कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डा परिसरातदेखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहावयास मिळत आहे. 

कोरोना, भूकंपानंतर आता गारपीटीचे संकट


जिल्हाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे नागरिक काळजी घेत असले तरी चिंतेत आहेत. त्यानंतर भूकंपाचा धक्काजाणवत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. यात आता गारपीटीची भर पडली आहे. अगोदरच लॉकडाउनमुळे नुकसान झाले असून आता गारपीटीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.   

खर्च लाखाचा ; तर उत्‍पन्न चाळीस हजारांचे

हयातनगर : वसमत तालुक्‍यातील हयातनगर येथील एका टरबूज उत्‍पादक शेतकऱ्यांला लागवडीचा खर्च एक लाख रुपये आला. मात्र, त्या तुलनेत उत्पन्न मात्र केवळ चाळीस हजार रुपयांचे मिळाले आहे. सध्या शेतात टरबूज विक्रीअभावी पडून आहेत. येथील शेतकरी प्रकाश सारंग यांनी एक हेक्टरवर टरबुजाची लागवड केली होती. 

४० हजार रुपयांचे बियाणे

त्‍यांनी वसमत येथून ४० हजार रुपयांचे बियाणे खरेदी केले. त्यासाठी १५ हजार रुपयांचे मल्‍चिंग पटी अंथरून घेतली. तसेच संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन करून वेळेवर खत, औषधी फवारणी केली. बोअरवेलची पाणी पातळी खोलावल्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याकडून पाणी घेऊन टरबुजाची जोपासना केली.


टरबूजाची शेतातूनच विक्री सुरू

प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर (ता.२५) एप्रिलपासून टरबूज विक्री करण्यास सुरवात केली. मात्र, लॉकडाउनमुळे मागणी घटली. सध्या रमजाननिमित्त चांगली मागणी असतानाही शहरात विक्री करता येत नाही. त्यामुळे टरबूज शेतातच पडून राहात असल्याचे चित्र आहे. सध्या त्‍यांनी शेतातूनच विक्री सुरू केली आहे. मात्र, यातून लागवडीचा खर्चही निघणे अवघड झाले असून केवळ चाळीस हजारांचेच उत्पन्न हाती आले आहे.

येथे क्लिक करासोयाबीन, हळद, तुरीचा पेरा वाढणार, कुठे ते वाचा...

अनुदानासाठी जिल्‍हा बँकेत लाभार्थींची गर्दी

गोरेगाव : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत केंद्र शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचे पैसे काढण्यासाठी मंगळवारी (ता. २८) गर्दी झाली होती. बँक सुरू होण्याअगोदरच बँकेच्या बाहेर रांगा लावण्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्‍याकडे लाभार्थी दुर्लक्ष करीत होते. बँकेतर्फे दररोज कोणत्या गावाला अनुदान देणार याची यादी लावण्यात आली आहे.

पोलिसांना पाचारण करावे लागले

 मात्र, त्‍याकडे न पाहता येथे गर्दी होत आहे. या प्रकाराने बँक प्रशासन त्रस्त झाले आहे. मंगळवारी पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर थोडी गर्दी कमी झाली होती. येथे आलेल्या लाभार्थींना रांगेत थांबण्यासासाठी पेंडाल टाकून सावलीची व्यवस्‍था करण्यात आली होती. तसेच खिडकीतून बँकेचे व्यवहार सुरू होते.