कोरोनामुक्ती नंतर ज्येष्ठांच्या सहवासाने पुन्हा फुलले इंद्रधनू वृद्धाश्रम!

Indra Dhanyush Elderly Home Umarga
Indra Dhanyush Elderly Home Umarga

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठांच्या मुळावर येऊ पाहतो आहे. आतापर्यंत पन्नाशी ओलांडलेल्या पन्नास लोकांचा कोरोनाने बळी घेतला. त्यात कुटुंबाचा विरह विसरण्यासाठी एकांतात इंद्रधनू वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनाही कोरोनाने घेरले. दुर्देवाने एका महिलेचा मृत्यू झाला. तेरा ज्येष्ठांनी मात्र मोठ्या धैर्याने कोरोनावर मात केली आहे. खरे तर वृध्दाश्रम ही पाश्र्चात्य संस्कृती म्हणून सुरवातीला या वृध्द सेवा केंद्रास बऱ्याच टिकेला सामोरे जावे लागले.

वृध्दाश्रम म्हणजे केवळ परिवारिक विवंचनेतून सुटका करणारे केंद्र ही सर्वसाधारण मानसिकता बदलून ज्येष्ठांना आयुष्यातील अपूर्ण राहिलेले छंद जोपासणे, मनसोक्तपणे समवयस्कांच्या समवेत स्वच्छंदी जीवन जगणे, आयुष्यातील अनुभवाच्या शिदोरीचा उपयोग समाजाला करून देणे आणि हे सर्व करित असताना ज्येष्ठांच्या डोळ्यांमध्ये आनंदी भाव पाहणे.

या संकल्पनेतून अस्तिमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दामोदर पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्र मागील तेवीस वर्षांपासून पूर्ण प्रवेश क्षमतेने यशस्वीरित्या गरजू ज्येष्ठांच्या सेवेत तत्परतेने कार्यरत आहे. मात्र कोरोनाने या केंद्रात शिरकाव केला. पती-पत्नी असलेल्या प्रारंभी लक्षणे जाणवली. त्यात पत्नीच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि संपूर्ण वृद्धाश्रम हादरले. त्यानंतर ३९ निवासी ज्येष्ठ नागरिक, पाच कर्मचारी व पाच विश्‍वस्तांची १२ सप्टेंबरला चाचणी घेण्यात आली. त्यात बारा ज्येष्ठ व पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आले, तर उर्वरित ज्येष्ठांना निगेटिव्ह अहवालाने दिलासा मिळाला.

महावितरणमुळे ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा, लातुरात विजेचा लपंडाव

तेरा ज्येष्ठांनी केली कोरोनावर मात
पॉझिटिव्ह आलेल्या तेरा ज्येष्ठांची कोविड रुग्णालयात सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. ईदगाह कोविड सेंटरमध्ये दहा दिवस त्यांच्यावरील उपचाराची व औषधोपचारी चांगल्या प्रकारे सोय करण्यात आली. २४ सप्टेंबरला ते कोरोनामुक्त झाले. दरम्यान सध्या वृद्धाश्रमात २६ ज्येष्ठ नागरिक आहेत. निगेटिव्ह आल्यानंतर तूर्त घराकडे गेलेले आठ व कोरोना मुक्तीनंतर घराकडे गेलेले पाच असे तेरा ज्येष्ठांना १४ ऑक्टोबरला पुन्हा वृद्धाश्रमात प्रवेश दिला जाणार आहे. त्यातील काही जण दोन दिवसांत व वृद्धाश्रमात येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. कोरोनावर मात केलेले दोन कर्मचारी ज्येष्ठांच्या सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे वृद्धाश्रम पुन्हा ज्येष्ठांच्या सहवासाने फुलले आहे.

ज्येष्ठांना उतार वयात स्वच्छंदी आयुष्य जगता यावे, त्यांच्या आशा - आंकाक्षांना संधी मिळावी म्हणून वृद्धाश्रमात विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर ज्येष्ठांची काळजी घेतली, तरीही संसर्ग आला. एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वेदना झाल्या. अनेकांनी कोरोनावर मातही केली. पुन्हा वृद्धाश्रम ज्येष्ठांच्या सहवासाने फुलले आहे. सतर्कता बाळगता सर्वांची काळजी घेतली जात आहे.
- डॉ.दामोदर पतंगे, अध्यक्ष, अस्तिमा विश्वस्त मंडळ

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com