esakal | पाच वर्षे संपले तरी आमसभा न झाल्याने सेलूतील विकासकामांना ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

सेलू परभणी

पाच वर्षे संपले तरी आमसभा न झाल्याने सेलूतील विकासकामांना ब्रेक

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : गेल्या पाच वर्षांपासून न होणारी आमसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही झाली नाही. त्यामुळे सेलू तालुक्याच्या विकासात भर घालणाऱ्या प्रकल्पासह विविध विकासकामांना ब्रेक लागला आहे.

वर्षभरात एक वेळेस मतदारसंघाच्या आमदार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत आमसभा घेण्याचा पायंडा होता. परंतु गेल्या पाच वर्षात याला खंड पडला होता.सेलू- जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर या पुन्हा आमसभा सुरु करतील अशी सेलूकरांना अपेक्षा होती. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही आमसभा झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रलंबित असलेले लोअर दूधना प्रकल्प त्याचसोबत विकासकामे खुंटली असून सर्वसामान्यांचे प्रश्नही अडगळीला पडले आहेत.

हेही वाचा - नांदेड : मांजरम परिसरात अवकाळी पाऊस; विज पडून म्हैस व वासरु ठार

यामध्ये हादगाव (पावडे) परिसरातील औद्योगिक वसाहत अर्धवट आहे. मंजूर झालेले १३२ के. व्ही. वीज केंद्र रद्द झाले. याशिवाय मेहकर ते पंढरपूर हा सेलू मार्गे पालखी रस्ता वाटुर (फाटा) मार्गाने पळवला. या विकासाला छेद देणाऱ्या बाबींकडे ना नागरिक, ना लोकप्रतिनिधी, ना अधिकाऱ्यांनी पाहिले. हादगाव (खु.) शिवारातील २४५.८१ हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित उद्योगाच्या दृष्टीने अनुकूल मानली जाते. मात्र सेलू तालुक्यासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रश्नांकडेही लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत आहे.

तसेच तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा यासाठी हादगाव (पावडे) परिसरात १३२ के.व्ही. वीज केंद्र मंजूर झाले. भूमिपूजन सोहळाही पार पडला.त्यानंतर मात्र ते रद्द झाले. सेलू तालुक्यातील नऊ ठिकाणच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राला पाथरी, परतूर व जिंतूर येथून वीजपुरवठा घ्यावा लागत आहे. हे सेलूकरांसाठी दुर्दैवच आहे. तसेच येथिल उपजिल्हा रुग्णालयातील शंभर खाटांचा प्रस्ताव प्रलंबित असून रिक्त पदे भरले नाहीत. यासह इतर प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमसभा आवश्यक असल्याचे सेलूतील नागरिक बोलून दाखवत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सेलू तालुक्यात आमसभा न झाल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याने अनेक विकास कामांना खिळ बसली आहे.सेलू तालुक्यातील औद्योगिक वसाहत, १३२ के.व्ही.,बस डेपो या सारख्या अनेक विकास कामांना वाचा फोडण्यासाठी आमसभा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- छगन शेरे, संभाजी ब्रिगेड, राज्य उपाध्यक्ष.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top