बोलावणे धाडल्यानंतर साहेब ट्रॅफिकमध्ये अडकले!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

लातूर - पालकमंत्री पंकजा मुंडे शंभर किलोमीटर अंतरावरून दुपारी दोन वाजता येथे आल्या व त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली. गांधी चौकात कार्यालय असलेले जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. के. एच. दुधाळ हे मात्र बैठकीला वेळेवर येऊ शकले नाहीत. कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकले होते. बोलावणे धाडल्यानंतर बैठकीला आलेल्या डॉ. दुधाळ यांनी केलेल्या खुलाशामुळे पालकमंत्री मुंडे यांनी डोक्‍याला हात लावला. यामुळे चिडलेल्या पालकमंत्र्यांनी डॉ. दुधाळ यांच्यासह बैठकीला गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसी हॉलमध्ये दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. बैठकीचे निमंत्रण काही दिवसांपूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या स्थितीत डॉ. दुधाळ यांच्यासह महावितरणचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह आठ ते दहा अधिकारी गैरहजर असल्याची बाब अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

पालकमंत्र्यांनी आढावा घेण्यास सुरवात केल्यानंतर डॉ. दुधाळ यांनी त्यांच्या प्रतिनिधींना बैठकीला पाठवल्याचे दिसून आले. प्रतिनिधींनी डॉ. दुधाळ हे प्रधान सचिवांच्या व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी (व्हीसी) गेल्याचे सांगितले. त्यावर श्रीमती मुंडे यांनी मंत्री मोठे की प्रधान सचिव मोठे? असा प्रश्न उपस्थित करून डॉ. दुधाळ यांना बोलावून घेण्यास सांगितले. त्यानुसार प्रतिनिधींनी डॉ. दुधाळ यांना बोलावून घेतले व ते काही वेळातच सभागृहात उपस्थित झाले. पालकमंत्र्यांनी उशिराचे कारण विचारल्यानंतर डॉ. दुधाळ यांनी ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगितले. प्रधान सचिवांची व्हीसी तीन वाजता होती, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. यावर श्रीमती मुंडे चांगल्याच संतापल्या. मी एवढ्या दूर अंतरावरून वेळेवर बैठकीला येते व तुम्ही इथल्या इथे ट्रॅफिकमध्ये कसे काय अडकता, असे विचारत त्यांनी खेद व्यक्त केला.

Web Title: After Invited the boss stuck in traffic!