esakal | Coronavirus| दुखणं अंगावर काढणं पडतंय महाग
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Coronavirus| दुखणं अंगावर काढणं पडतंय महाग

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना: जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण संख्या वाढली आहे. त्यातच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरिक दुखणे अंगावर काढत असल्‍याने प्रकृती अधिकच खालावली जात आहे. त्‍यामुळे ऑक्‍सिजन तसेच रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनची मागणी वाढत आहे. परंतु, ही वेळ का आली? याच विचार कोणीही करण्यास तयार नाही.

ग्रामीण भागातील खाजगी डॉक्‍टरांकडून योग्य उपचार होत नसल्‍याने वेळ निघून जात आहे. त्‍यानंतर रुग्ण जिल्‍हा कोविड सेंटरसह खाजगी रुग्णालयात ऑक्‍सिजन बेडसह रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनसाठी नातेवाईकांची धावाधाव होत आहे. परंतु, कोरोनाचे लक्षणे दिसून येताच कोरोनाची चाचणी करुन योग्य उपचार घेतले तर ऑक्सिजन बेडसह रेमडेसिव्हिर इंजेक्शनची रूग्णांना गरज पडणार नाही, असे तज्‍ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे रोज सहाशे ते नऊशेपर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आजघडीला जिल्ह्यात तब्बल एक हजार १९२ रूग्ण हे आॅक्सिजनवर तर ११४ रूग्ण हे व्हेंटिलेटवर आहेत. तर प्रत्येक दिवसाला तब्बल एक हजार १५० रेमडेसििव्हर इंजेक्शनची मागणी आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन बेडसह रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी धावपळ होत आहे. परंतु, ही परिस्थिती निर्माण का झाली? याचे कारण म्‍हणजे रुग्णांना योग्य वेळ योग्य ते उपचार न मिळणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसला आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये ताप, सर्दी, खोकला असे आजार झाले की रूग्ण गावातील डाॅक्टरांकडे जाऊनउपचार घेतात. गावातील अनेक डाॅक्टारांकडून सर्दी, ताप, खोकल्यावर रूग्णांना औषध दिले जाते. किंवा टायफाईडचे उपचार केले जातात. मात्र, कोरोना चाचणी करण्याकडे ग्रामीण भागातील अनेक डाॅक्टरांकडून दुर्लक्ष केले जाते. या उपचारानंतर रूग्णाला तात्‍पुरता आराम मिळतो. परंतु, यामध्ये चार ते पाच दिवस जातात. परिणामी शरीरात कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. त्यामुळे कोरोनाचा स्कोर वाढल्याने रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.

हेही वाचा: संचारबंदीत भूमीपुजनाचा अट्टहास! आमदार संजय शिरसाटसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

त्यानंतर नातेवाईकांची जिल्हा कोविड रूग्णालयासह खाजगी कोविड सेंटरकडे ऑक्सिजन बेडसह रेमडेसिव्हिर इंजेक्शकनासाठी धावपळ सुरू होते. मुळात सर्दी, ताप, खोकला असे लक्षणे दिसून आल्यानंतर कोरोनाची चाचणी करून तत्काळ योग्य उपचार मिळाले तर रूग्णाला आॅक्सिजन बेडसह रेमडेसिव्हिर इंजेक्शनांची गरज पडत नाही, असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे लक्षणे दिसून आल्यानंतर तत्काळ कोरोना चाचणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनाला हरवणे शक्य आहे.

ग्रामीण भागातील सर्दी, खोकला, ताप असलेल्या रूग्णांवर उपचार करताना काही डाॅक्‍टर कोरोना चाचणी करत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील डाॅक्टरांकडून रोगाचे योग्य निदान न झाल्याने रुग्णांचा कोरोना स्कोर वाढतो. त्यानंतर शासकीय किंवा खाजगी कोविड सेंटरमध्ये रूग्ण दाखल होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून ग्रामीण भागातील डाॅक्टारांमध्ये कोरोना सदृश्‍य रुग्णांवर उपचाराची गाईड लाईन करण्यासाठी पथक स्थापन केले आहे. तसेच कोरोना लक्षणे असलेल्या रूग्णांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागातील जे डाॅक्टर सांगूनही एेकणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना

ग्रामीण भागातील रूग्ण हे सर्दी, खोकला, ताप असे लक्षणे असताना प्राथमिक उपचारासाठी जवळच्‍या खाजगी डाॅक्टरांकडे जातात. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचे योग्य उपचार होत नाहीत. त्यांची प्रकृती अधिक खालावते. परंतु, कोरोनाचे लक्षणे दिसल्यानंतर शासकीय रूग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून उपचार घ्यावे. रूग्णाला वेळेत योग्य उपचार मिळाले तर रुग्णांना ऑक्सिजन किंवा रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज पडणार नाही.

- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक, जालना.

loading image