आमचा पाहू नका अंत, वैद्यकीय महाविद्यालय द्यावे तुरंत; परभणीकर संघर्ष समितीचे धरणे आंदोलन

गणेश पांडे 
Sunday, 24 January 2021

यावेळी विविध नेत्यांची भाषणे झाली. या भाषणातून त्यांनी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तातडीने मंजूर करावे, अशी जोरदार मागणी लावून धरली.

परभणी : परभणीकरांचा पाहू नका अंत. वैद्यकीय महाविद्यालय द्यावे तुरंत यासारख्या परिणामकारक घोषणांनी रविवारी (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील परिसर दणाणून गेला. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी परभणीकर संघर्ष समितीच्यावतीने रविवारी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधीसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परभणीकर संघर्ष समितीचे निमंत्रक खासदार फौजिया खान व माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, भाजप आमदार मेघना बोर्डीकर, रासप आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, माजी महापौर प्रताप देशमुख, माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर, स्वराजसिंह परिहार, तहसिन अहेमद खान, रविराज देशमुख, सुभाष जावळे पाटील, सुरेश भुमरे, रामेश्वर शिंदे, गणपत भिसे, डॉ. अनिल कान्हे, डॉ. संजय खिल्लारे, राजेश बालटकर, विष्णू सायगुंडे आदी सहभागी झाले होते.

हे ही वाचा : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामान्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत

यावेळी विविध नेत्यांची भाषणे झाली. या भाषणातून त्यांनी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तातडीने मंजूर करावे, अशी जोरदार मागणी लावून धरली. परभणीकर संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार डॉ. विजयराव गव्हाणे म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीची मागणी शासन दरबारी रेटून धरत आहोत. परभणीने सर्व निकष पूर्ण केलेले असतानाही महाविद्यालयास अद्यापही मंजुरी मिळत नाही. स्वत: शरद पवारांनी आपल्याला शब्द दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी स्वत: दिलेल्या शब्दाचे ही पालन करावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री नवाब मलिक यांनी धरणे आंदोलन कर्त्याची भेट घेवून त्यांचे निवेदन स्विकारले.

डीपीडीसीमध्ये प्रस्ताव घेणार

उद्या होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवून निश्चितपणे शिफारस करणार आहोत. उस्मानाबादला महाविद्यालय मंजूर झाल्याने परभणीकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो आधी दूर करावा. कारण परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासंदर्भात अनेक वेळा मंत्रीमडंळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
- नवाब मलीक, पालकमंत्री, परभणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An agitation has been organized on Sunday on behalf of Parbhanikar Sangharsh Samiti