उस्मानाबाद : मातंग समाजाकडून आक्रोश मोर्चा

सयाजी शेळके
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून देशपांडे स्टँड, शिवाजी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हातात लाल झेंडा घेऊन सहभागी झाले होते.

उस्मानाबाद : मातंग समाजावरील अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २१) आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकातून देशपांडे स्टँड, शिवाजी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हातात लाल झेंडा घेऊन सहभागी झाले होते.

मातंग समाजावरील वाढत्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शहरात मंगळवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार वर्षात मातंग समाजावरील अन्यायात वाढ होत आहे. दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. रुद्रवाडी, वाकडी येथील प्रकरणी तसेच धुळे येथे विहिरीच्या पाण्यावरून मातंग समाजातील युवकांची धिंड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अॅट्रॉसीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे. उस्मानाबाद शहरात आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

मुलींनी केले निवेदनाचे वाचन 
शहरातून निघालेल्या या आक्रोश महामोर्चात सर्वच पक्षाचे नेतेमंडळी सहभागी झाली होते. यामध्ये कोणाचेही नेतृत्व नव्हते. सुमारे २०० स्वयंसेवकांनी मोर्चाचे नियोजन केले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर लहान मुलींनी निवेदनातील मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी हातात लाल झेंडा घेऊन मोठ्या संख्येने मोर्चेकरी दुपारी एकच्या सुमारास आण्णाभाऊ साठे चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले. यावेळी सुमारे २०० कार्यकर्त्यांनी मोर्चाचे नियोजन केले होते. सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते. 

दुपारी एक वाजता मोर्चाला सुरवात झाली. त्यापूर्वी अकरापासून जिल्ह्याच्या विविध भागात मोर्चासाठी कार्यकर्ते आण्णाभाऊ साठे चौकात येत होते. गटागटाने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आण्णाभाऊ साठेंच्या नावाने घोषणाबाजी करीत होते. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. ‘जय लहुजी‘ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आण्णाभाऊ साठे चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी पाण्याची तसेच नाश्त्याची सोय करण्यात आली होती. 

Web Title: agitation by matan community in usmanabad