लातुरात विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

गेल्या बारा वर्षांपासून येथे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालय व हजारो विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून येथे विद्यापीठ स्थापन करावे, या मागणीकरिता आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने सोमवारी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

लातूर ः गेल्या बारा वर्षांपासून येथे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र कार्यरत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालय व हजारो विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून येथे विद्यापीठ स्थापन करावे, या मागणीकरिता आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने सोमवारी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

लातूर जिल्ह्यात कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या 150 पेक्षा जास्त, तर 54 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालकाना आजही परीक्षा फॉर्म आणि अन्य शैक्षणिक कामासाठी नांदेडला जावे लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात केवळ 109 महाविद्यालये असताना तेथे शासनाने विद्यापीठ सुरू केले आहे.

लातूरच्या उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याबाबत विद्यापीठ कायदा 2016 अंतर्गत कलम 3(2) नुसार शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी गेली जात आहे; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी आम्ही लातूरकर विद्यापीठ कृती समितीच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात माजी आमदार वैजनाथ शिंदे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. व्यंकट बेंद्रे, ऍड. उदय गवारे, अफजल कुरेशी, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, मुन्ना तळेकर, प्राचार्य शिरीष पिल्ले, प्रा. सत्यशील सावंत, प्रा. डॉ. पी. पी. नथाणी, मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, प्रा. योगेश शर्मा, बशीर शेख, अंगद भोसले, व्यापारी संघटनेचे रईस टाके, प्रा. गिरीधर तेलंगे आदींनी सहभाग नोंदविला. मुख्य संयोजक ऍड. प्रदीपसिंह गंगणे, धनराज जोशी यांच्यासह समिती सदस्यांनी पुढाकार घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for university in latur