टाकीवर चढून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

औरंगाबाद - पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरूच असून, सोमवारी (ता. सात) भवानीनगर वॉर्डातील नागरिकांनी क्रांती चौक वॉर्ड कार्यालयाशेजारील पाण्याच्या टाकीवर चढून तासभर जोरदार आंदोलन केले. ‘हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, महापालिकेचे करायचे काय...’ अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला व अधिकाऱ्यांना घेराव घातला. 

औरंगाबाद - पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरूच असून, सोमवारी (ता. सात) भवानीनगर वॉर्डातील नागरिकांनी क्रांती चौक वॉर्ड कार्यालयाशेजारील पाण्याच्या टाकीवर चढून तासभर जोरदार आंदोलन केले. ‘हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, महापालिकेचे करायचे काय...’ अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला व अधिकाऱ्यांना घेराव घातला. 

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक गेल्या दोन महिन्यांपासून कोलमडले आहे. दोन दिवसांआड पाणी देण्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात चार-पाच दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. गुलमोहर कॉलनी, मथुरानगर येथील नागरिकांनी सिडको एन-पाच येथील पाण्याच्या टाकीवर दोन दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सोमवारी दादा कॉलनी, दत्तनगर, न्यू संजयनगर येथील नागरिकांनी सकाळीच क्रांती चौकातल्या पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. गेल्या सहा दिवसांपासून या भागात नळाला पाणी आलेले नाही. तसेच रात्री बारानंतर पाणी दिले जाते, असा आरोप करीत नागरिक पाण्याच्या टाकीवर चढले. महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. तासभर आंदोलन करूनही एकही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्याशी संपर्क साधला. तेही बैठकीत होते. त्यामुळे उपअभियंता ख्वाजा घटनास्थळी आले. संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत धारेवर धरले. यापुढे दिवसाच पाणीपुरवठा करू, रमजान महिन्यात वेळेवर पाणी देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी सय्यद हुसेन, विशाल मगरे, शेख मुख्तार, शेख सत्तार, गणेश सिरसाट, निखिल महाले, शेख शमीम, आरेफा बेगम, कांताबाई जाधव, नर्मदाबाई पाखरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

माझ्याच घरात पाणी नाही
नागरिक नगरसेवक मनोज बल्लाळ यांच्या घरी गेले असता, ‘माझ्याच घरात पाणी नाही, मी तरी काय करू,’ असे हतबल उद्‌गार त्यांनी काढले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली.

सातारा - देवळाईतील टॅंकरचा मुहूर्त हुकला 
औरंगाबाद, ता. ७ ः सातारा - देवळाई भागात मोफत टॅंकर देण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतरच टॅंकर सुरू करण्यात येतील, असे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सोमवारी (ता. सात) सांगितले. 

सातारा - देवळाई भाग महापालिकेत समाविष्ट होऊन दोन वर्षे उलटली आहेत; मात्र अद्याप या भागात महापालिकेतर्फे सोयी - सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या भागात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे किमान टॅंकरने मोफत पाणी देण्यात यावे, असा प्रस्ताव नगरसेवक राजू शिंदे यांनी ठेवला होता. त्यावर महापौरांनी तत्काळ टॅंकर सुरू करण्याचे आदेश दिले होते; मात्र गेल्या महिन्यात आदेश दिल्यानंतर अद्याप प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही. ही बाब शनिवारी (ता. पाच) झालेल्या सर्वसाधारण सभेत श्री. शिंदे यांच्यासह सायली जमादार, आप्पासाहेब हिवाळे यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार रविवारपासूनच (ता. सहा) टॅंकर सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले. परंतु, सोमवार उजाडला तरी टॅंकर सुरू न झाल्याने महापौरांनी कार्यकारी अभियंत्याकडे चौकशी केली. तेव्हा आयुक्तांच्या मंजुरीसाठी फाईल पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सातारा - देवळाईत नागरिकांना मोफत पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: agitation for water on water tank