कपाशी मोडीत काढायला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कळंब  तालुक्‍यात सुमारे सत्तर हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली; परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. वाढ खुंटल्याने तालुक्‍यातील इटकूर परिसरातील शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीचे पीक मोडीत काढायला सुरवात केली आहे. 

कळंब (जि. उस्मानाबाद) ः तालुक्‍यात सुमारे सत्तर हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली; परंतु पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. वाढ खुंटल्याने तालुक्‍यातील इटकूर परिसरातील शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीचे पीक मोडीत काढायला सुरवात केली आहे.

तालुक्‍यात खरीप हंगामातील सरासरी 64 हजार 376 हेक्‍टर क्षेत्र आहे. सरासरीचा आकडा पार करत यंदा 69 हजार 805 हेक्‍टर म्हणजे 108 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यात तुरीची चार हजार हेक्‍टर, कपाशी दोन हजार 300, सोयाबीनची 56 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तुरळक, रिमझिम पावसावर ही पेरणी झाली होती. अद्याप दमदार पाऊस न झाल्याने आणि आता रिमझिमही होत नसल्याने, कडक ऊन पडत असल्याने सर्वच पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. 

कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव
नगदी पीक असलेल्या कपाशीची शेतकऱ्यांनी जेमतेम पावसावर लागवड केली. समाधानकारक पाऊस न झाल्याने कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. महागड्या औषधांची फवारणी केली तरी हा रोग आटोक्‍यात येईना. दुसरीकडे जमिनीत ओल नसल्याने कपाशीची वाढ खुंटली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हे पीक उखडून काढण्याची तयारी केली आहे. इटकूर परिसरातील शेतकरी तर कपाशी मोडीत काढू लागले आहेत. 

सोयाबीन करपू लागले
तालुक्‍यात दरवर्षी सोयाबीनची 40 ते 45 हजार हेक्‍टरवर पेरणी होते. यंदा मात्र 56 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. पावसाअभावी हे पीकही करपू लागले आहे. 

दुष्काळामुळे चाराटंचाई तीव्र झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी पिवळीची लागवड केली आहे. पाऊस नसल्याने हे पीकही करपू लागले आहे. त्यामुळे चाराटंचाई तीव्र जाणवत आहे. विहिरी, कूपनलिका, नदी-नाले कोरडेच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना चारा-पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टॅंकरच्या पाण्याशिवाय आधार उरलेला नाही. चार ते पाच हजार रुपये प्रतिटनाप्रमाणे ओला चारा विकत घेऊन जनावरांना जगवावे लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture News