अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

औरंगाबाद - महिला शेतकऱ्यांचे लागोपाठ येणारे गट, शेती औजारांभोवती विद्यार्थ्यांची झालेली गर्दी, कृषी तंत्र व उत्पादनांच्या स्टॉल्सवर तरुण शेतकरीपुत्रांची उडालेली झुंबड आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी चर्चासत्राला लावलेली कृषी चिंतन बैठक, असे अनोखे चित्र ‘अॅग्रोवन’च्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे दुसऱ्या दिवशीचे (ता. २८) होते.    

औरंगाबाद - महिला शेतकऱ्यांचे लागोपाठ येणारे गट, शेती औजारांभोवती विद्यार्थ्यांची झालेली गर्दी, कृषी तंत्र व उत्पादनांच्या स्टॉल्सवर तरुण शेतकरीपुत्रांची उडालेली झुंबड आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी चर्चासत्राला लावलेली कृषी चिंतन बैठक, असे अनोखे चित्र ‘अॅग्रोवन’च्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे दुसऱ्या दिवशीचे (ता. २८) होते.    

औरंगाबादच्या बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर भरलेल्या `अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात फेरफटका मारताना पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हरवून गेल्या होत्या. 
‘‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उमेद देणारे ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन मी पाहिले; तुम्हीदेखील पाहा," असा संदेश ग्रामविकासमंत्र्यांनी दिला. दुस-या दिवशी बीड, जालना, औरंगाबाद, परभणी, नांदेड भागांतील शेतकरी प्रदर्शनात मोठ्या संख्येने दिसत होते.  

विशेषतः महिला शेतकरी, महिलांचे बचत गट, तरुण शेतकरी, तसेच शेतकरी गटांनी प्रदर्शनातील स्टॉल्सभोवती गर्दी केली होती. दर्जेदार शेती उत्पादनाची माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून घेत असताना काही भाग्यवान शेतक-यांना सोडत पद्धतीने बक्षिसे वाटली होती. त्यामुळे शेतक-यांचा हुरूप वाढला होता. 

ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांच्या स्टॉल्सभोवती युवक शेतक-यांची जास्त गर्दी होती. एक टनाचा बैल बघण्याचा मोह दूध उत्पादक शेतक-यांना आवरता येत नव्हता. 

मराठवाड्यातील शेतक-यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्राविषयी कमालीची उत्सुकता आधीपासून आहेच. अॅग्रोवनच्या प्रदर्शनात चितळे डेअरी उद्योग समूहाने हमखास कालवड देणा-या सेक्सेल सिमेन्स तंत्राची माहिती प्रथमच काही शेतक-यांना मिळत होती. दुष्काळामुळे तहानलेल्या शेतक-यांना पाण्याच्या नियोजनाचे महत्त्व किती वाटते, याची साक्ष प्रदर्शनातील पाणी व्यवस्थापनाच्या स्टॉल्सभोवती झालेल्या गर्दीमुळे पटत होती. टॅक्टरमधील बदलत्या तंत्राला समजावून घेत ट्रॅक्टरसोबत सेल्फी काढण्यात युवा शेतकरी आघाडीवर होते. वाचनसंस्कृती कमी झाल्याची ओरड शहरांमधून होत असली, तरी आधुनिक शेती तंत्रज्ञान पुस्तकांच्या आधारे समजावून घेण्यासाठी शेतकरी आतूर झाल्याचे प्रदर्शनातील पुस्तकांच्या स्टॉलभोवती झालेल्या गर्दीतून दिसत होते. आधुनिक तंत्रातून बनविलेल्या घरगुती तेल घाण्याला महिला शेतकरी बारकाईने समजावून घेत होत्या. देशी बियाण्यांच्या स्टॉलवर महिला शेतकरी गटाची गर्दी झाली होती.

पशुसंवर्धनच्या दालनात महिलांची झुंबड
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने ‘ॲग्रोवन’च्या प्रदर्शनात माहिती देण्यासाठी उघडलेल्या दालनात महिला शेतकऱ्यांची गर्दी होती. १०० टक्के अनुदानावर मुरघास युनिटची उभारणी, हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा व पशुखाद्य उत्पादनाच्या पद्धती या दालनात आहेत. शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांची माहिती घेण्यातदेखील महिला आघाडीवर होत्या.

Web Title: Agrowon Agriculture Exhibition Response