विविधताच समाजाचे खरे सौंदर्य - डॉ. आ. ह. साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

साहित्य क्षेत्रात वेगळी मुद्रा उमटवलेल्या डॉ. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्ताने खास सत्कार सोमवारी करण्यात आला. संविधानाची प्रत, महात्मा फुलेंची पगडी, तुळशीची माळ आणि मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. अमृतमहोत्सव समितीतर्फे आयोजित या सोहळ्यास माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, लेखक श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

लातूर - समाजातील विविधता जपण्याची जास्त आवश्यकता आहे. या विविधतेने आपल्याला कुरूप बनवले नाही. ती समाजाची त्रुटी नाही. कलंकही नाही. ही विविधताच आपल्या समाजाचे खरे सौंदर्य आहे. भूषण आहे.

त्यामुळे संघर्षाच्या नव्हे सलोख्याच्या, माणसे तोडण्याच्या नव्हे जोडण्याच्या मार्गाने आपल्याला पुढे जावे लागेल... अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपले मुक्तचिंतन मांडले.

साहित्य क्षेत्रात वेगळी मुद्रा उमटवलेल्या डॉ. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवानिमित्ताने खास सत्कार सोमवारी करण्यात आला. संविधानाची प्रत, महात्मा फुलेंची पगडी, तुळशीची माळ आणि मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. अमृतमहोत्सव समितीतर्फे आयोजित या सोहळ्यास माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, लेखक श्रीकांत देशमुख उपस्थित होते.

विविधतेमध्ये असंख्य स्तर आहेत. जात, धर्म, पंथ, पेहराव, संस्कृती, आहार-विहार अशा विविध स्तरातील लोकांना जोडण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो. ही विविधता जपण्याची आज जास्त गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. साळुंखे म्हणाले, वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन मी वाढत गेलो. स्वतःचा विकास साधत गेलो. एका टप्प्यावर मला चार्वाक भेटला. त्यानंतर चार्वाक तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'आपले आयुष्य ललित साहित्यासाठी खर्ची करायचे नाही', हे मी ठरवले. खरतर चार्वाकाने मला अत्यंत आवडीच्या अशा ललित साहित्यापासून पळवून नेले. पण याची मनात खंत नाही. 

डोळस राहणे गरजेचे 
जीवनात सत्य-असत्य, हितकारक-अहितकारक मिसळून आलेले असते. नेमकेपणाने जे हिताचे, ज्ञानाचे, प्रकाशाचे आहे, ते वेचून घेणे, त्यासाठी जागरूक राहणे, डोळस राहणे गरजेचे आहे. कुठलीही गोष्ट स्वीकारताना स्वतःचा अनुभव महत्वाचा असतो. तो घ्या. मेंदू धारण करणाऱ्या माणसाला आपले डोके सत्यापुढे झुकवायचे की असत्यापुढे, याचा अधिकार आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जायचे असेल तर बुद्धीचा स्वतंत्रपणे उपयोग करायचा असतो, हे मी शिकलो, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. देशमुख म्हणाले, प्रश्न विचारणाऱ्या परंपरेतील डॉ. साळुंखे हे एक नाव आहे. पण त्यांनी नुसते प्रश्न विचारले नाहीत, उत्तरेही दिली. विवेक सौताडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

या सत्कार सोहळ्याने माझे मन भारावून गेले. हा बळ देणारा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा सत्कार आहे. खरतर आ. ह साळुंखे या व्यक्तीचा हा सत्कार नसून माझ्या भूमिकेचा सत्कार आहे, असे मी मानतो.
- डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AH Salunkhe Talking