Ajit Pawar
Ajit Pawarsakal

Ajit Pawar : छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेवरून पवारांकडून मंत्री, अधिकाऱ्यांची खरडपट्टी

मनपाची शहर पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हाच मुद्दा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुक्रवारी आढावा बैठकीत चांगलेच धारेवर धरले.

छत्रपती संभाजीनगर : मनपाची शहर पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हाच मुद्दा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुक्रवारी आढावा बैठकीत चांगलेच धारेवर धरले. ‘सरकार पैसे देत राहते, मात्र योजना वेळेत पूर्ण करून घेत नाहीत. परिणामी बजेट वाढत जाते. त्यानंतर सरकारकडे पुन्हा हात पसरता’ अशा शब्दांत पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, पवार यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ‘शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे. त्यावरील व्याजाचा बोजा देखील सरकारने काढून घेतला. तरीही योजना पूर्ण होत नाही. शासनाने दिलेला निधी वेळेवर खर्च केला जात नाही.

योजना रखडत राहिल्याने जलवाहिनीचे बजेट वाढत गेले. तुमच्या शहरातील योजना तुम्ही लक्ष देऊन पूर्ण का करत नाही?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जलवाहिनीसाठी सॉफ्टलोन देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, सॉफ्टलोनची देखील परतफेड करण्याची तुमची तयारी नाही. तुम्हाला कितीवेळा पैसे द्यायचे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी चर्चा करून व्यवहारिक मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

निधी खर्चावरून नाराजी

मराठवाड्यातील पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजनाचा निधी वाढवून देण्याची मागणी केली आहे. पुढील वर्षी हा निधी वाढवून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा नियोजन विभागाच्या ५०० कोटींपैकी अवघा ७० टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. या खर्चावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महत्त्वाचे अधिकारी गैरहजर

आढावा बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जलसंपदा व जलसंधारण विभागाचे अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार बैठकीत संतापले. मी असा निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असे सांगत संताप व्यक्त केला.

सहा ठिकाणी दिव्यांग भवन

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून शहरात दिव्यांग भवन उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, याशिवाय राज्यात सहा ठिकाणी दिव्यांग भवन उभारण्यात येणार असल्याचे आढावा बैठकीनंतर पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यासोबतच शहरात भूमिगत विद्युत केबलिंग व ड्रेनेजलाइनसाठी निधी देण्याचे त्यांनी मान्य केले. नेहमीच्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयाला शस्‍त्रागारासाठी ७० कोटी रुपये त्याचप्रमाणे जिल्हा परिषद इमारतीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे ते म्हणाले.

करोडीला क्रीडा विद्यापीठ

शहरातील क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, तसे काहीही घडलेले नाही, असा खुलासा पवार यांनी केला. छत्रपती संभाजीनगरातील करोडीत ११५ एकर जागेत क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल. यासंदर्भातील प्रस्ताव पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवावा. त्यावर येत्या अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com