आकांक्षा देशमुख खून प्रकरण: राहुल शर्माने यामुळे निवडला चोरीचा मार्ग

मनोज साखरे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

औरंगाबाद - गावी जायचे, पैसे नव्हते. ठेकेदाराला पाच हजार रुपये मागितले पण त्याने दिले नाही. म्हणून त्याने चोरीचा मार्ग निवडला. वसतिगृहातील "सॉफ्ट टार्गेट' म्हणून त्याने विद्यार्थिनीच्या खोलीत चोरी करायचे ठरवले, अशी बाब खुनातील संशयिताने सांगितली. 

औरंगाबाद - गावी जायचे, पैसे नव्हते. ठेकेदाराला पाच हजार रुपये मागितले पण त्याने दिले नाही. म्हणून त्याने चोरीचा मार्ग निवडला. वसतिगृहातील "सॉफ्ट टार्गेट' म्हणून त्याने विद्यार्थिनीच्या खोलीत चोरी करायचे ठरवले, अशी बाब खुनातील संशयिताने सांगितली. 

राहुल शर्मा मूळचा उत्तर प्रदेशातील दुधीनगर येथील रहिवासी. सहा महिन्यांपासून एमजीएममध्ये बांधकाम मजूर आहे. गंगा वसतिगृहापासून काही अंतरावर त्याची खोली. येथेच त्याचे वास्तव्य होते. वसतिगृहाजवळच सात दिवसांपासून तो काम करीत होता. त्यामुळे कामादरम्यान वसतिगृहातील मुलींची वर्दळ व त्यांच्या हालचालींकडे त्याचे लक्ष जात होते. राहुलने सांगितल्यानुसार, त्याची पत्नी गर्भवती आहे. तिच्यासाठी पैशांची गरज होती. आठ दिवसांनी गावाकडे जाऊन कुटुंबीयांना पैसे द्यावेत असा त्याचा इरादा होता. त्याने पाच हजार रुपये ठेकेदाराला मागितले. परंतु, ठेकेदाराने पैसे दिले नाहीत. तेव्हापासून तो चोरी कुठे करावी याची मनातच योजना आखत होता. मुलींच्या वसतिगृहात त्यांच्याकडे पैसे असतील असा तर्क लावून त्याने प्लॅन केला. पाणी पिण्यासाठी तसेच या-ना त्या कारणाने तो वसतिगृहात ये-जा करीत राहिला. दहा डिसेंबरला दरवाजा उघडा असलेली आकांक्षाची खोली आयतीच मिळाली व त्याने सोनसाखळी चोरून तिचा खून करीत गाव गाठले. 

दरम्यान, आकांक्षा गेली याचे दुःख आहे; परंतु तिचा संशयित मारेकरी पकडला. याचे समाधान वाटले. पोलिसांची कामगिरी अभिमानास्पद आहे, अशा भावना आकांक्षाच्या भावाकडून व्यक्त झाल्या. 

प्रात्यक्षिक करवून घेतले 
गंगा वसतिगृहात संशयित मारेकरी कोणत्या रस्त्याने गेला. खोलीत जाताना तो कसा गेला, जास्त वेळ कोठे थांबला. हे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने घटना कशी घडली, याचे त्याच्याकडून प्रात्यक्षिक करून घेत पोलिसांनी खुनाच्या उलगड्यानंतरच्या तपासाला सुरवात केली. 

आकांक्षाचा मारेकरी पोलिस कोठडीत 
एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुखची हत्या करणाऱ्या राहुल शर्मा याला बुधवारी (ता. 19) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांच्यासमोर हजर केले. त्याच्या ताब्यातून सोन्याची चेन, खून करण्याचा उद्देश काय होता याचा तपास करावयाचा असल्याने पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने शर्माला 26 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत राहुल शर्माने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला 18 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली. बुधवारी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांच्यासमोर हजर केले असता सरकारी वकील ऍड. सूर्यकांत सोनटक्के यांनी त्याच्या ताब्यातून सोन्याची चेन जप्त करावयाची आहे, आकांक्षाचा खून करण्यामागचा काय उद्देश आहे, हे जाणून घ्यायचे असल्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरून त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

Web Title: Akanksha Deshmukh murder case Rahul Sharma choose the way of theft