धर्म आणि साहित्याची गल्लत नको : महानोर

आशिष तागडे
Friday, 10 January 2020

ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्‌घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत होते. मात्र असे फोन आले तरीही महानोर उद्‌घाटक म्हणून संमेलनाला हजर राहिले आहेत. 

संत गोरोबाकाका नगरी (उस्मानाबाद) : धर्म आणि साहित्य हे दोन वेगवेगळे विषय आहेत या दोन्ही विषयांची एकमेकांत मिसळून गल्लत करू नका. आपल्याला धार्मिक आणि साहित्यिक परंपरा आहेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांनी 'सकाळशी' बोलताना व्यक्त केले.

उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटक, प्रख्यात कवी, पद्मश्री ना. धों. महानोर यांना "साहित्य संमेलनाला जाऊ नका' असे फोन आले होते. वेगवेगळ्या लोकांनी, ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रोज फोन करून संमेलनाला न जाण्याच्या सूचना केल्या होत्या. ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्‌घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत असल्याचे ना. धों. महानोर यांचे नातू शशिकांत महानोर यांनी "सकाळ'ला सांगितले होते. मात्र असे फोन आले तरीही महानोर उद्‌घाटक म्हणून संमेलनाला हजर राहिले आहेत. 

महानोर म्हणाले सगळ्यांना सामावून घेणारा व समृद्ध असा धर्म आणला पाहिजे. धर्म हा माणसाच्या उद्धारासाठी असतो. त्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आपल्याकडे संविधानानुसार सगळ्यांना स्वतंत्र मत मांडण्याचा सर्व जाती धर्मानं मत मांडण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.  

हेही वाचा - फादर फ्रान्सिस दिब्रिटो काय म्हणतात?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि साहित्य संमेलन संदर्भात ते म्हणाले, की गेल्या 35 वर्षांपासून या विषयावर बोलत आहोत. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पाणी निर्माण करून दिले पाहिजे. त्यासाठी पाणी आयोगाची निर्मिती केली आहे कर्जमाफी ही तात्पुरती असून त्यांने कायमस्वरूपी प्रश्न सुटणार नाही कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पाणी देण्याची गरज आहे. वाचनाअभावी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आपण पुरेशा गांभीर्याने कोणतेच वाचन करत नाही, अशी खंतही महानोर यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News Na Dho Mahanor