मराठवाड्याला मिळाला सांस्कृतिक न्याय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत प्रथमच होणार असले तरी मराठवाड्यात ते तब्बल पंधरा वर्षांनी होत आहे. याआधी ते पुण्या-मुंबईभोवतीच अनेक वर्षे फिरत राहिले. आता झालेला निर्णय हा मराठवाड्याला मिळालेला सांस्कृतिक न्याय आहे.

लातूर -  आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत प्रथमच होणार असले तरी मराठवाड्यात ते तब्बल पंधरा वर्षांनी होत आहे. याआधी ते पुण्या-मुंबईभोवतीच अनेक वर्षे फिरत राहिले. आता झालेला निर्णय हा मराठवाड्याला मिळालेला सांस्कृतिक न्याय आहे. यानिमित्ताने मराठवाड्याचा सांस्कृतिक बॅकलॉगही भरून निघेल, अशा शब्दांत लेखकांनी भावना व्यक्त केल्या. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 93 वे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होईल, असे आज जाहीर केले. त्यानंतर मराठवाड्यातील सांस्कृतिक विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याआधी 2004 मध्ये औरंगाबाद येथे 77 वे साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी समीक्षक डॉ. रा. ग. जाधव यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर पंधरा वर्षांनंतर मराठवाड्यात हे संमेलन होणार आहे. 

आधीच व्हायला हवे होते 
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, "उस्मानाबाद हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने काहीसा मागासलेला जिल्हा आहे. पण मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे केंद्र राहिलेला हा परिसर आहे. उस्मानाबादला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळे याआधीच उस्मानाबादमध्ये संमेलन व्हायला हवे होते; पण पुण्यातील महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दुष्काळाचे कारण पुढे करून न्याय दिला नाही. आता तो मिळाला आहे. संमेलनानिमित्त उस्मानाबादमधील साहित्य, संस्कृतीची परंपरा राष्ट्रीय नकाशावर येईल. उस्मानाबादेतील सांस्कृतिक एकोपा खूप महत्त्वाचा वाटतो.' 

संमेलन साधेपणाने व्हावे 
माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, "माझा जन्म ज्या जिल्ह्यात झाला आहे, तेथे आगामी साहित्य संमेलन होणार आहे, हे ऐकून अतिशय आनंद झाला. आजवर अनेक लेखक, कथाकार, कवी, समीक्षक या जिल्ह्याने दिले आहेत. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशा या जिल्ह्यात संमेलन होणार आहे. त्यामुळे तिथले सांस्कृतिक वैभव, सांस्कृतिक संपन्नता राज्यासमोर, देशासमोर येईल, याची खात्री आहे. संमेलनात साहित्यबाह्य विषयावर चर्चा रंगू नये, एवढीच अपेक्षा आहे. संमेलन कमीत कमी पैशांत, साधेपणाने कसे करता येईल, याचाही विचार व्हावा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan will be held for the first time in Osmanabad