मद्यपी प्रवाशाने चक्क एसटी बस पळविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

सुरक्षारक्षकाने प्रवेशद्वारातच बस अडविल्याने मोठा अनर्थ टळला 

लातूर : मद्यपी प्रवाशाने मुख्य बसस्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये चढून चक्क चालकाची जागा घेतली. बस सुरू करून पळवून बाहेर घेऊन जात असतानाच बसस्थानकातील सुरक्षारक्षकाने त्याला प्रवेशद्वारातच अडविले.

त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्या मद्यपी प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार शहरातील मुख्य बसस्थानकात शनिवारी (ता. 24) रात्री साडेअकरा वाजता घडला. निलंगा डेपोची एसटी बस लातुरातील मुख्य बसस्थानकात आली होती. चालक आणि वाहक जेवणासाठी खाली उतरले. तेवढ्यात एक मद्यपी चालकाच्या केबिनमध्ये शिरला. बटन स्टार्ट करून त्याने बस सुरू केली; पण दारूच्या नशेत असल्यामुळे तो वेडीवाकडी बस चालवू लागला. हा प्रकार प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्यांनी लगेच बस थांबविण्याची धडपड सुरू केली. त्यामुळे मद्यपी प्रवाशाला प्रवेशद्वारातच ब्रेक लावावा लागला. त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी चालकाच्या जागेवरून खाली ओढले. 

तेवढ्यात गस्तीवरील पोलिस घटनास्थळी थांबले. त्यांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मद्यपी प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर बाळासाहेब वाघमारे (वय 26, रा. झरी, ता. चाकूर) असे या प्रवाशाचे नाव आहे. हा काहीसा वेडसर आहे, असेही पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुण्यात झालेल्या संतोष माने प्रकरणाची अनेकांना आठवण झाली. मुख्य बसस्थानकातील ही बस सुरक्षारक्षकांनी वेळीच अडविली नसती तर मोठा अनर्थ घडला असता, अशीही चर्चा बसस्थानक परिसरात सध्या होत आहे. 
 

मुख्य बसस्थानक परिसरात सध्या पुरेशी सुरक्षाव्यवस्था आहे; पण असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लवकरच आणखी काही निर्णय घेतले जातील. 
- सचिन क्षीरसागर, 
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An alcoholic passenger Drive a bus