हिंगोली : रेल्वे मार्गावर 'की मॅन'च्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ

मंगेश शेवाळकर
रविवार, 30 जून 2019

हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळावरील अपघात 'की मॅन'च्या सतर्कतेने टळला...

हिंगोली : हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाखालील पट्टी तुटल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन लाल झेंडी दाखून रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रविवारी (ता. 30) सकाळी 8:30 वाजता हा प्रकार घडला आहे. पट्टी बदलण्याचे काम केल्यानंतर एक तासाने रेल्वे मार्गस्थ झाली.

हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर कनेरगाव जवळील पैनगंगा नदीच्या पुलाच्या जवळ रेल्वे विभागाचे कर्मचारी दिनेश वर्मा, बाबासाहेब खंदारे, विजय झापडे, सतीश जनसेवक, प्रदीप शुगरे आदी कर्मचारी आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाच्या कामासाठी जात होते. यावेळी पैनगंगा नदीच्या पुलावर असलेल्या रेल्वे रुळाच्या खालील लोखंडी पट्टी तुटल्याने दोन रुळामधील अंतर वाढल्याचे त्यांना दिसून आले, त्याचवेळी वाशिमकडून हिंगोलीकडे अकोला पूर्णा रेल्वे येत होती. नदीच्या पुलावरच लोखंडी पट्टी तुटल्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरून धावत जाऊन रेल्वेला थांबण्याचा इशारा दिला. कर्मचाऱ्यांनी लाल झेंडे दाखवल्यामुळे रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखून रेल्वे थांबवली. त्यानंतर त्यांनी रेल्वे याची पाहणी केली असता नेमके पैनगंगा नदीच्या पुलावरच रेल्वे रुळाखालील लोखंडी पट्टी तुटल्याचे पाहिल्या नंतर रेल्वे चालकाने लोखंडी पट्टी बदलल्या नंतरच रेल्वे पुढे जाऊ शकते असे स्पष्ट केले. त्यानंतर पट्टी बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून मागील अर्ध्या तासापासून अकोला-पूर्णा रेल्वे पैनगंगा नदीच्या पुलाजवळ उभी करण्यात आली आहे. त्यानंतर एक तासाने पट्टी बदलून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. रेल्वे रूळाच्या कामाला जाणाऱ्या रेल्वे कर्मचार्‍यांना रेल्वे रुळाचा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the alert of Key Man passengers life was saved at Hingoli railway route

टॅग्स