30 July 2019 : औरंगाबादमध्ये कुणी केली आत्महत्या, कुणाला झाला अपघात?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

औरंगाबाद शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मंगळवारी (ता. 30) चोरी, अपघात, आकस्मात मृत्यू यासह इतर गुन्ह्यांची नोंद झाली. त्याचे एकत्रित वृत्त

औरंगाबाद शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मंगळवारी (ता. 30) चोरी, अपघात, आकस्मात मृत्यू यासह इतर गुन्ह्यांची नोंद झाली. त्याचे एकत्रित वृत्त
 
आजारी कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू 
हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्याचा उपचारादरम्यान सायंकाळी सातच्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शिवाजी कोंडिबा दिवटे (वय 65) असे मृताचे नाव आहे. तो आजाराने त्रस्त होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. 
 

हॉटेलात गळफास लावून तरुणाची आत्महत्या 
भीमनगर, भावसिंगपुरा येथील तरुणाने एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रात्री पावणेअकराच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मिलिंद माणिक दांडगे (वय 30, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे मृताचे नाव आहे. भीमनगर, भावसिंगपुरा येथील कांता हॉटेलमध्ये वरच्या पत्र्याच्या खोलीत मिलिंदने वायरद्वारे गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच तेथील दोघांनी मिलिंदला घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

नोटिसीची अहवेलना, एकावर गुन्हा 
पाळीव डुकरे शहराबाहेर नेण्याची नोटीस देऊनही अहवेलना केली. या प्रकरणात एकाविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. महापालिकेचे पर्यवेक्षक अनंत जाधव यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अनिल रिडलॉन असे संशयिताचे नाव आहे. महापालिकेने त्यांना डुकरे शहराबाहेर नेण्याबाबत नोटीस दिली. त्यानंतरही नोटीसचे पालन त्यांनी केले नाही. सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

डी-मार्टसमोरून दुचाकी लंपास 
दर्गा रोड, डी-मार्टसमोरून चोराने दुचाकी लंपास केली. गणेश शिवाजी झिलमेवाड (रा. विजेयंतनगर, देवळाई रोड, सातारा परिसर) यांनी याबाबत तक्रार दिल्यानुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी 
मोपेड दुचाकीच्या धडकेत दीपक रखमाजी भोईटे (रा. एन- 11, हडको) हे जखमी झाले. ही घटना दूध डेअरी सिग्नलजवळ घडली. ते रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकी त्यांना धडकली. यात ते जखमी झाले. अशा तक्रारीनुसार या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
शहरातून तीन दुचाकी लंपास 
शहरातील सिडको एन- तीन, मौलाना आझाद महाविद्यालय पार्किंग परिसर, रेल्वेस्टेशन रोड येथून चोरांनी तीन दुचाकी लंपास केल्या. या घटनांप्रकरणी अनुक्रमे पुंडलिकनगर, सिटी चौक व वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संदीप गोरखनाथ अंभोरे (रा. महालपिंप्री) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना सिडको एन- तीन येथे 24 जुलैला साडेसात ते साडेआठ या वेळेत घडली. अंभोरे साईनाथ रुग्णालयासमोर दुचाकी लावून आत गेल्यानंतर चोरीचा प्रकार घडला. जरीरोद्दीन इसाकउद्दीन शेख (रा. पंचायत समितीमागे, औरंगाबाद) यांची दुचाकी चोराने 28 जुलैला लंपास केली. ही घटना मौलाना आझाद महाविद्यालयामागील पार्किंगमध्ये घडली. वैजनाथ माधवराव सूर्यवंशी (रा. कोकणवाडी) यांची दुचाकी
चोराने लंपास केली. ही घटना 27 जुलैला रेल्वेस्थानक रोड, वेदांतनगरात घडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Crime News in Aurangabad