सर्व पक्षांना स्वबळाची खुमखुमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद : राज्यातील नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून प्रत्येक पक्ष स्वबळावरच लढण्याची भाषा करू लागला आहे. 

औरंगाबाद : राज्यातील नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून प्रत्येक पक्ष स्वबळावरच लढण्याची भाषा करू लागला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, पैठण, गंगापूर व खुलताबाद या पाच नगरपरिषदांसाठी 18 डिसेंबर 2016 रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांनी स्थानिक कार्यकर्त्यांचा दाखला देत "एकला चलो‘चा नारा दिला. जिल्ह्यातील पाचही नगरपरिषदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्या कायम राखण्याचे आव्हान स्वबळाची भाषा करणाऱ्या या दोन्ही पक्षांना पेलवेल का, हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेनेला नगरपरिषदेत सत्ता मिळवून स्वत:ची प्रतिष्ठा जपण्याबरोबाच ताकद दाखवून द्यायची आहे. 
यातील जालना-4, परभणी-7, हिंगोली-3, बीड-6, उस्मानाबाद -8, लातूर -4, औरंगाबाद -5 व नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपरिषदांसह 2 नगर पंचायतीसाठी तीन टप्यात मतदान होणार आहे. राज्यात आरक्षणासह कोपर्डीप्रकरणी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे निघणारे मोर्चे, ऍट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेला दलित समाज यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपसमोरच खऱ्या अर्थाने आव्हान आहे. 

स्वबळाचा जोर 
कॉग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 41 आणि 40 आमदार निवडून आले आहेत. दोन्ही पक्षांचे संख्याबळ बरोबर असल्याने नगरपरिषद निवडणुकीत आघाडी करायची असेल तर जागांचे वाटप निम्मे निम्मे हवे असा एक मत प्रवाह आहे. पण आमचीच ताकद जास्त असा दावा दोन्ही कडून केला जात असल्याने हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. तर काही ठिकाणची राजकीय परिस्थिती, जातीय समीकरणे पाहून आघाडी केली जाऊ शकते. 

औरंगाबाद जिल्ह्यात कॉंग्रेस 101 टक्के स्वबळावर लढणार आहे. आघाडी संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रस्ताव आला होता, मात्र कार्यकर्त्यांची आघाडीची इच्छा नाही. एखाद्या ठिकाणी आघाडी होऊ शकते. 
अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, औरंगाबाद 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडणूक प्रभारी धनंजय मुंडे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे याचा आढावा आणि सन्मानाने बोलणी झाली तर पुढे पाऊल टाकू. अन्यथा आम्ही स्वतंत्र लढण्यास सज्ज आहोत. 
भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर- आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

युतीला आमचे प्राधान्य असेलच, पण सन्मानाने तोडगा निघायला हवा, नाही तर स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. 
अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख, औरंगाबाद 

शिवसेनेशी युती करायची की नाही याचा अधिकार तालुका, जिल्हाध्यक्षांना देण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला आहे. 
किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष, औरंगाबाद 

Web Title: all parties boasting to fight alone