शिवसेनेचे सहाही उमेदवार विजयी 

मधुकर कांबळे
Friday, 25 October 2019

औरंगाबाद -  शिवसेनेने जिल्ह्यात 29 वर्षांपूर्वी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत पाच उमेदवार उभे केले होते. त्यावेळी तीन उमेदवार निवडून आले होते, तर दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी सहा ठिकाणी उमेदवार उभे केले आणि सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येण्याचा चमत्कार झाला आहे. विशेष म्हणजे ऐनवेळी शिवसेनेतून उड्या मारून दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्यांना जिल्ह्यातील मतदारांनी सपशेल नाकारले असून, हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहणार हे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम. त्यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनीही या जिल्ह्यावर तसेच प्रेम केले. जिल्ह्यात त्यांनी तीन ठिकाणी सभा घेतल्या. वर्ष 1990 मध्ये जिल्ह्यात शिवसेनेने पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. औरंगाबाद पश्‍चिम, पैठण, गंगापूर, कन्नड आणि वैजापूर या पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यावेळी पश्‍चिममधून चंद्रकांत खैरे 88 हजार 964 , पैठणमधून बबनराव वाघचौरे 48 हजार 273 मते तर गंगापूरमधून कैलास पाटील 43 हजार 233 मते मिळवून विजयी झाले होते. मात्र, वैजापूर आणि कन्नड येथे शिवसेना उमेदवारांना पराभव पाहावा लागला होता. याचीच पुनरावृत्ती वर्ष 1995 मध्येही झाली होती. त्यावेळीही गंगापूरमधून वर्ष 1990 मध्ये विजयी झालेले कैलास पाटील शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांनाही मतदारांनी नाकारले; मात्र शिवसेना उमेदवाराला निवडून दिले होते. वर्ष 1999 आणि 2004 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता

औरंगाबाद पश्‍चिममध्ये शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले होते. वर्ष 2009 मध्ये मतदारसंघांच्या झालेल्या पुनर्रचनेत औरंगाबाद पूर्व, पश्‍चिम व मध्य असे तीन मतदारसंघ झाले. त्यावेळी पश्‍चिममधून संजय शिरसाट 58 हजार आठ मते मिळवून पहिल्यांदा आमदार झाले. वर्ष 2014 मध्ये पश्‍चिममधून संजय शिरसाट 61 हजार 282 मते मिळवून दुसऱ्यांदा विजयी झाले होते. यावेळीही त्यांनी त्यांच्यासमोर भाजपच्या बंडखोराचे आव्हान असतानाही विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. वैजापूरमधून आर.एम. वाणी यांनी सुचवलेले प्रा. रमेश बोरनारे यांनी 98 हजार 183 मते मिळवून गेल्यावेळी गमवावी लागलेली शिवसेनेची जागा परत मिळवली आहे. गंगापूरमधून यावेळी शिवसेनेने दोन वेळा आमदार केलेले अण्णासाहेब माने व त्यांचे पुत्र संतोष माने ऐन निवडणुकीत शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेले; मात्र मतदारांनी त्यांना नाकारले आहे. कन्नडमधून यावेळी शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांना मतदारांनी निवडून दिले, तर शिवसेना सोडून गेलेले हर्षवर्धन जाधव यांनाही मतदारांनी नाकारले. पैठणमध्येही कधी काळी शिवसेनेत असलेले दत्ता गोर्डे यांना मतदारांनी नाकारले आणि संदीपान भुमरे यांना विजयी केले आहे. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार निवडून आले आहेत. तर गेल्या निवडणुकीत गमवावा लागलेला मध्य मतदारसंघ शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांच्या रूपाने पुन्हा खेचून आणला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Shiv Sena candidates win in aurangabad .