युतीचा निर्णय जिल्हा पातळीवर - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

नांदेड - केंद्रातील अडीच, राज्यातील दोन वर्षांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय जनता पक्ष राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांत नंबर एकवर आला आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका निवडणुकांतही असेच चित्र दिसेल, असा विश्वास या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (ता. दहा) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आम्ही कुणावरही युती लादणार नाही, शिवसेनेसोबत युती करण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांत भाजपला सर्वांत जास्त जागा, नगराध्यक्षपदे मिळाली. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, दहा महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. केंद्र, राज्य सरकारच्या विकासाचा अजेंडा घेऊनच जनतेसमोर जाणार आहोत. या निवडणुकांतही यश मिळेल. राज्यात होणाऱ्या तीन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीतही भाजप बाजी मारील, असे ते म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याला भाजपमध्ये प्रवेश दिल्याच्या प्रश्‍नावर, दानवे म्हणाले, ""भाजप हा महासमुद्र असून पक्षात येणाऱ्यांचे स्वागतच करू. गुन्हेगारी किंवा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना प्रवेश नाही. तशा काही तक्रारी असतील तर त्या तपासून निर्णय घेण्यात येईल. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील एका आमदाराने पक्षात प्रवेश केला असून, आणखी एक-दोन आमदार येण्यास इच्छुक आहेत.''

लक्ष्मीचे दर्शन तर रोजच
"लक्ष्मी दर्शन'च्या वक्तव्यावरून दानवे अडचणीत आले आहेत. आगामी स्थानिक निवडणुकांत मतदारांना लक्ष्मीदर्शन होणार का, असे पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, 'लक्ष्मी दर्शन नेहमीच होते.

निवडणुकीआधी आणि नंतरही ते होते. त्याचा वेगळा अर्थ लावू नका. याबाबतच्या वक्तव्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी जे उत्तर द्यायचे होते, ते दिले आहे. राजकारणात असे होतच असते. घाबरून राजकारण होत नसते.''

मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दानवे काही काळ बॅकफुटवर होते. या दरम्यान अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी दानवे गैरहजर होते. यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत बिनसले काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावर पत्रकारांनी छेडले असता, प्रसारमाध्यमांनी कितीही बिबा घालण्याचे काम केले, तरी आमच्यात असे काही नाही. आम्ही कालच एकत्र होतो. भाजपचे यश हे माझे किंवा मुख्यमंत्र्यांचे एकट्याचे नसून, ते सामूहिक आहे, असे ते म्हणाले.

सातबारा आमचाही
नांदेडचाच नव्हे तर भोकरदनचाही सातबारा कॉंग्रेसचा झाला असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यावर दानवे यांनी, राजकारणात कुणी कुणाचा सातबारा दाखवू नये. मालक तो मालकच असतो. जालना जिल्ह्यात भाजपची सत्ता असून भोकरदन पालिकेचे स्थानिक प्रश्न वेगळे असून, ते सर्वांना माहीत असल्याचे सांगितले. कामगार कल्याण व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे आदी उपस्थित होते.

Web Title: Alliance decision the district level