शाळेतील तांदूळ, डाळीचे विद्यार्थ्यांना होणार वाटप 

महेश गायकवाड 
शनिवार, 28 मार्च 2020

ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. शाळेचे मुख्याध्यापक किंवा त्या योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तांदूळ, डाळी, कडधान्य शिल्लक साठा विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटण्याचे नियोजन केले जाणार आहे.

जालना - कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेतील शालेय पोषण आहाराचा तांदूळ, डाळ व कडधान्याचा साठा खराब होऊ नये म्हणून, विद्यार्थ्यांना त्याचे वितरण करण्याचे आदेश शुक्रवारी (ता.२७) शासनाने दिले आहे. याबाबत प्रहार शिक्षक संघटनेने मागणी केली होती. 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये ता.३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र ,आता केंद्रशासनाने ता.१४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. शाळेचे मुख्याध्यापक किंवा त्या योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तांदूळ, डाळी, कडधान्य शिल्लक साठा विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटण्याचे नियोजन करावे. तसेच ह्या वितरणाची शाळा स्तरावर प्रसिद्धी देण्यात यावी.तांदूळ, डाळी, कडधान्य ह्या वस्तू नेण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचित करून शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकाना टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये बोलावुन तांदूळ, कडधान्य ,डाळी इत्यादीच्या वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. 

हेही वाचा : परदेशातून आलेल्या डॉक्टरला नोटीस

उपस्थित विद्यार्थी पालक यांना एकमेकांपासून रांगेत १ मीटर अंतरावर उभे करावे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळी, कडधान्य घरपोच करण्याचे नियोजन करावे. तांदूळ व डाळी, कडधान्य वाटप करतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग रोखण्याकरता घ्यावयाच्या दक्षतेबाबत दिलेले आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी पसध्या शाळेला सुटया दिलेल्या आहेत. मात्र, प्रत्येक शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्ये खराब होतील, त्याऐवजी हा साठा विद्यार्थ्यांना व गरजूंना वाटावा अशी मागणी प्रहार संघटनेने मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे केली होती.शासनाने स्पष्ट आदेश वितरित करून हा खराब होणारा तांदूळ व कडधान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना व पालकांना याचा फायदा होईल. 
संतोष राजगुरू,  
जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना जालना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allocation of rice, pulses to school students