परभणीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लगबग

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

परभणी महापालिका क्षेत्रातील शाळांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळांनी निर्जंतुकीकरणाचे काम सुरू केले आहे. शाळा व्यवस्थापन समित्या व मुख्याध्यापकांकडून किती विद्यार्थी शाळेमध्ये येणार आहेत, याचा देखील वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे.

परभणी - महापालिका क्षेत्रातील शाळांना गुरुवारपासून (ता. दहा) सुरुवात होत असून शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. बैठक व्यवस्था, वेळापत्रकाची निर्देशानुसार जुळवाजुळव करून शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.

परभणी महापालिका क्षेत्रातील शाळांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळांनी निर्जंतुकीकरणाचे काम सुरू केले आहे. शाळा व्यवस्थापन समित्या व मुख्याध्यापकांकडून किती विद्यार्थी शाळेमध्ये येणार आहेत, याचा देखील वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे. विद्यार्थ्यांचे संमतीपत्र मागवले जात आहेत. त्यानुसार शाळांमधील आसन व्यवस्था केली जात असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - परभणीच्या मेडिकल काॅलेजसाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यासह शरद पवारांना साकडे..

वेळापत्रक बनविण्यासाठी शाळांची कसरत 
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील शाळा तीन किंवा चार तासाच्या राहणार आहेत. तसेच शाळांमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या तासिका घेण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थ्यांना येणे हे ऐच्छिक करण्यात आले असून जे विद्यार्थी येत नाहीत त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची देखील आदेश आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही वेळापत्रकांचा गुंता सोडवावा लागणार आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाईन वेळापत्रक, त्याच दरम्यान इयत्ता पाचवी ते नववी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वेळापत्रक तयार करण्यासाठी शाळांना कसरती कराव्या लागणार आहेत. बहुतांश पालकांनी सकाळच्या सत्रातच ऑनलाइन तासिका घेण्याचे सुचवले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातच ही दोन्ही वेळापत्रक बनविण्यासाठी शाळांची कसरत सुरू असल्याचे दिसून येते. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड : तीन दुचाकी चोरांना अटक, दागिणे व दुचाकीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त- शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी 

महापालिकेकडून निर्जंतुकीकरणाचा आढावा
महापालिकेची पथके जिल्हा प्रशासनाने प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील विविध शाळांमध्ये फिरून निर्जंतुकीकरणाचा आढावा घेत आहेत. निर्जंतुकीकरण केले की नाही? याची चौकशी करून निर्जंतुकीकरण करुन देण्याची तयारी देखील दर्शवली जात आहे. परंतु पालिकेचा दर पाहता अनेक शाळांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. निर्जंतुकीकरणासाठी शुल्क आकारणी महानगरपालिकेने वाहन खर्च, रसायनांचा खर्च यासाठी निर्जंतुकीकरणासाठी एक रुपया स्क्वेअर फूट दर आकारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  ज्या शाळा स्वतः निर्जंतुकीकरण करू शकत नाहीत, अशा शाळांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु शाळांची व्याप्ती व  महापालिकेचा दर पाहता  शाळांना ही बाब परवडणारी नाही . म्हणून बहुतांश शाळांनी महापालिकेच्या या सुविधांकडे दुर्लक्ष केले असून  निर्जंतुकीकरणासाठी स्वतःची यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची अनेक शाळांनी खरेदी केलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या योजनेला शहरात मात्र फारसा प्रतिसाद मिळाला मिळत नसल्याचे दिसून येते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Almost for the reception of students in Parbhani schools, parbhani news