अंबड-जालना बस पडली बंद, प्रवाशांना ताटकळत राहावे लागले उभे

बाबासाहेब गोंटे
Wednesday, 2 September 2020

अंबड-जालना महामार्गावरील हरतखेडा फाट्यालगत एसटी महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी (ता.दोन) प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. प्रवाशांना जवळपास तीन तास वाहनांची प्रतीक्षा करत ताटकळत महामार्गाच्या लगत उभे राहावे लागले.

अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील हरतखेडा फाट्यालगत एसटी महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी (ता.दोन) प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. प्रवाशांना जवळपास तीन तास वाहनांची प्रतीक्षा करत ताटकळत महामार्गाच्या लगत उभे राहावे लागले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड आगरातून जालनाकडे जात असलेल्या बसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.

अंबड बसस्थानकातून प्रवाशी मोठ्या अपेक्षाने बसमधे बसून जालना शहराचे तिकीट काढले. मात्र प्रवाशांना घेऊन बस जालना येथे न पोचता हरतखेडा फाट्यावरच बुधवारी सकाळी अकरा वाजेपासून दुपारपर्यंत जागेवरच उभी होती. प्रवाशांना जाण्यासाठी दुसऱ्या बसगाडीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने प्रवाशाची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. अखेर जास्तीचा अर्थिक भुर्दंड सोसत खासगी वाहनाने जीवधोक्यात घालून नाईलाजास्तव जालन्याचा प्रवास करावा लागला.

उस्मानाबाद पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी हालचालींना वेग

एकीकडे कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले तर दुसरीकडे जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ जनतेवर आली आहे. गत सहा महिन्यापासून बससेवा कोविड १९ च्या धर्तीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ठप्प झाली होती. लालपरी रस्त्यावर न येता एकाच जागेवर उभी असताना साधी दुरुस्तीची कामे करण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याने आता प्रवाशांना मनस्थाप सहन करण्याची वेळ आली.

डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारो भाविकांची उपस्थिती

बस वाहक व चालकांनी मोबाईलवरून बसमध्ये बिघाड झाल्याचे कळविल्यानंतर ही बसगाडीची व्यवस्था करण्यात आली नाही. अखेर चालकाला अंबड आगारात जावे लागले. नंतर वाहकाला ताटकळत दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. अगोदरच कोरोना महामारीच्या संकटामुळे जनता पुरती भयभीत आहे. त्यातच सुरक्षितता व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसना प्रवास करताना येणाऱ्या अडचणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.

(संपादन- गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambad-Jalna Bus Stop Jalna News