Ambadas Danve : दानवेंच्या विधानाची राज्यभर चर्चा; म्हणाले, ''दगड धोंडे जरी...'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danve

Ambadas Danve : दानवेंच्या विधानाची राज्यभर चर्चा; म्हणाले, ''दगड धोंडे जरी...''

Ambadas Danve News : सत्तांतरानंतर शिवसेनेतील अनेकांनी शिवसेनीची साथ सोडत शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी पक्ष वाढवायचा की शिवसैनिकांचं मनपरिवर्तन करायचं असा दुहेरी प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर उभा राहिला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या विधानाची जोरदार चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरेंनी राज्यात शिवसेनेची अशी काही हवा निर्माण केली आहे की, उद्या निवडणुकीत दगड धोंडे जरी उभे केले तरी ते निवडून येतील असे दानवे म्हणाले आहेत. जालना येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

हेही वाचा: Atul Bhatkhalkar : हाच माज गांधी खानदानाला होता; भाजपचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

यावेळी दानवेंनी शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण गोठवण्यावरून भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसैनिकांना चिन्हाची चिंता करू नका,असे म्हणत शिवसैनिक हा निधड्या छातीने संकटांना सामोरा जाणारा असतो. ग्रामपंचायत निवडणूक, पंचायत समिती, विविध कार्यकारी सोसायट्या अशा अनेक निवडणुकांमध्ये चिन्ह कुठलेही असले तरीही शिवसेनेचा मतदार ते शोधून पॅनल विजयी करत आला आहे. त्यामुळे चिन्ह कोणाला मिळेल याची फारशी चिंता करू नका असे आवाहन दानवेंनी उपस्थित शिवसैनिकांना केले. न्यायालयात सत्याचाच विजय होणार आहे, धनुष्यबाण कुठेही जाणार नाही याची खात्री बाळगा,असेही दानवे म्हणाले.

हेही वाचा: Raj Thackeray : भाजपच्या बालेकिल्ल्यातून 'मनसे' फुंकणार रणशिंग; आखणार नवी रणनीती

आधी Who Are You? च्या प्रश्नाचं उत्तर द्या

जालन्यातील विधानापूर्वी दानवेंनी सत्तांतरावरील सुनावणीदरम्यान शिंदे गटाला प्रश्न Who Are You? असा विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या असे म्हणत टोला लगावला होता. तसेच सरन्यायाधिशांच्या या प्रश्नावर आता शिंदे गटाला उत्तर द्यावेच लागणार असून, त्यानंतर सर्वच प्रश्न निकाली लागतील असे दानवे म्हणाले होते. शिंदे गटाची चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे शिंदे गटाने आगामी निवडणुकांचा धसका घेतल्याचं दिसून येत असल्याचेही दानवे म्हणाले होते.

तर, दुसरीकडे चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवर चंद्रकांत खैरे यांनीदेखील तिखट प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारखं आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक अधिक आक्रमक होतील असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

Web Title: Ambadas Danve Maharashtra Political Crises Uddhav Thackeray Aditya Thackeray Jalana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..