अंबाजोगाईतील उत्खनन बेकायदा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

औरंगाबाद - अंबाजोगाईतील काही ग्रामस्थांनी चालविलेले पुरातन सकलेश्‍वर मंदिराचे उत्खनन बेकायदा असून, ते तत्काळ थांबवावे, असे पत्र राज्य पुरातत्त्व विभागाने तहसीलदारांना पाठविले आहे. हे उत्खनन विनापरवानगी करण्यात आले असून, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक गुरुवारी (ता. 26) प्रत्यक्ष जाऊन स्थळाची पाहणी करणार आहेत.

औरंगाबाद - अंबाजोगाईतील काही ग्रामस्थांनी चालविलेले पुरातन सकलेश्‍वर मंदिराचे उत्खनन बेकायदा असून, ते तत्काळ थांबवावे, असे पत्र राज्य पुरातत्त्व विभागाने तहसीलदारांना पाठविले आहे. हे उत्खनन विनापरवानगी करण्यात आले असून, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक गुरुवारी (ता. 26) प्रत्यक्ष जाऊन स्थळाची पाहणी करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात चालुक्‍यकालीन मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना म्हणून सकलेश्‍वर मंदिराची ओळख आहे. स्वच्छता मोहीम राबवत असल्याचे सांगत हनुमंत पोखरकर, महाजन परिवाराने थेट जेसीबी चालवून बाराखांबी मंदिर परिसर उकरून काढला. यात अनेक प्राचीन शिल्पे, मूर्ती आणि मंदिराचा जमिनीखालील भाग उघडा पडला. हे खोदकाम सुरू असताना पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्याने संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या सूचनेस डावलून जेसीबी चालविण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाने म्हटले.

देशभरात कुठेही प्राचीन स्थळावर खोदकाम करणे "भारतीय निखात निधि अधिनियम 1878' आणि "मुंबई निखात निधि अधिनियम 1959' अन्वये गुन्हा आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या उत्खनन शाखेची विशेष परवानगी मिळवल्याशिवाय असे काम करता येत नाही; मात्र येथे थेट जेसीबी आणि इतर अवजारे वापरून खोदकाम झाल्यामुळे या चालुक्‍यकालीन पुरास्थळाचे नुकसान झाल्याचे राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांनी सांगितले. ही उघड्यावर आलेली दुर्मिळ शिल्पे आता कारवाई करून पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करावीत, असे राज्य पुरातत्त्व विभागाने तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत पुरातत्त्व विभागाचे संचालक, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे पथक गुरुवारी या स्थळाची पाहणी करणार आहे.

या ठिकाणी खोदकाम करणे नियमबाह्य असल्याचे दहा-बारा दिवसांपूर्वीच स्थानिकांना कळविण्यात आले होते; मात्र तरीही मंदिर परिसर उकरण्यात आला. उताविळपणे घाई करून, यंत्रे चालवून ऐतिहासिक वास्तूचे नुकसान करू नये.
- अजित खंदारे, सहायक संचालक, राज्य पुरातत्त्व

Web Title: Ambajogai illegal excavation

टॅग्स