चला, माणुसकी जपूया!

चला, माणुसकी जपूया!

औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९) करण्यात आले. दरम्यान, सुमित कवडे आणि डॉ. अतुल देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

क्रांती चौकातील झाशीची राणी उद्यान येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी आम्ही माणुसकी जपत अपघातग्रस्तांना मदत करणार असल्याची सर्वांनी शपथ घेतली. यावेळी आमदार अतुल सावे, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्‍त नरेश मेघराजनी, पृथ्वीराज पवार, कीर्ती शिंदे, आमदार संजय सिरसाट, अनिल मकरिये, दिलीप थोरात, शिरीष बोराळकर, अनिल पैठणकर, सतनाम गुलाटी, किरण शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. संदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. 

पुण्यात हेल्प रायडर्समध्ये काम करणाऱ्या रोहित बोरकर यांनी तेथील ग्रुपची माहिती दिली. कार्यक्रमात रुग्णवाहिका चालक आणि आमदार सिरसाट यांनी अनुभव सांगितले. 

‘सुमितसारखे इतरांसोबत होऊ नये’ 
सुमितचा अपघात झाल्यानंतर तो ४० ते ४५ मिनिटे पडून इतरांना मदतीची याचना करीत होता; मात्र बघ्यांनी केवळ छायाचित्र, व्हिडिओ घेतले. त्यास मदत मिळाली असती तर तो वाचला असता, असे भावुक होऊन सुमितचे काका राकेश कवडे सांगत होते. सुमित सोबत जे झाले तसे इतर कुणाबाबत होऊ नये. आपल्याकडून मदत होत नसेल तर किमान १०८ क्रमांकावर माहिती कळवा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘तर आज भावजी आपल्यात असते’
भावजीचा अपघात झाला. त्यांनी मदतीसाठी अनेकांकडे मागणी केली; मात्र कुणीच पुढे आले नाही. त्यांना मदत मिळाली असती तर ते आजच्या कार्यक्रमात आपल्यात असते, असे पाणवल्या डोळ्यांनी स्वप्नील देशमुख यांनी सांगितले.

‘मी वाचलो, इतरांना मदत करणार’
माझा सेव्हन हिल येथे अपघात झाला होता. पूर्ण जबडा फाटला होता. तेव्हा हेल्प रायर्डसचे सदस्य येथून जात असताना त्यांनी मला पाहिलं आणि घाटी रुग्णालयात दाखल केलं. वेळेत मदत मिळाल्यामुळे वाचलो. आता ग्रुपसोबत इतरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे मिलिंद लिहिणार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com