महावृक्षावर अखेर घाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

औरंगाबाद - दीडशे वर्षांपासून शहानूरवाडी चौकात दिमाखात उभे असलेले चिंचेचे डेरेदार झाड महापालिकेने गुरुवारी (ता. २६) तोडले. या झाडाला वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. 

औरंगाबाद - दीडशे वर्षांपासून शहानूरवाडी चौकात दिमाखात उभे असलेले चिंचेचे डेरेदार झाड महापालिकेने गुरुवारी (ता. २६) तोडले. या झाडाला वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. 

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या अलीकडे शहानूरवाडी चौकात चिंचेचे जुने झाड होते. उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहन चालकांना ते दिसत नसल्याने या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाला. त्यामुळे हे झाड तोडावे, असा आग्रह वाहतूक शाखेकडून होत होता; मात्र या झाडामुळे वाहतुकीला अडथळा होत नाही, असा दावा निसर्गप्रेमींनी करून ते तोडण्यास विरोध केला; परंतु गुरुवारी या झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी हे झाड तोडण्यास आलेल्यांना वृक्षप्रेमींच्या विरोधानंतर माघारी फिरावे लागले होते. अखेर गुरुवारी महापालिकेने ते तोडले.

वृक्ष समितीने दिली नाही परवानगी
हे झाड तोडण्यास वृक्ष समितींच्या सदस्यांनी परवानगी दिली नसल्याचेही पर्यावरण प्रेमींनी सांगितले. असे असताना महापालिकेने हे झाड तोडल्याचा दावाही त्यांनी केला. 

काय म्हणतात  पर्यावरण प्रेमी?
पर्यावरण प्रेमी डॉ. किशोर पाठक म्हणाले, ‘‘परिसरातील अडीच ते तीन हजार लोकांना ऑक्‍सिजनचा पुरवठा या झाडाच्या माध्यमातून होत होता. शिवाय विविध ३५ प्रजातीचे कीटक, पक्षी, सरपटणारे जिवांचे हे झाड आश्रयस्थान होते. झाडाच्या बाजूचा कठडा काढण्यात आल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा नव्हता. उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनधारकांना एवढे मोठे झाड दिसत नव्हते हा वाहतूक पोलिसांचा दावा खोटा आहे. बाजूची कमान वाचवण्यासाठी झाडाचा बळी घेतला गेला,’’ असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, दिलीप यार्दी यांनीही महापालिकेच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

Web Title: AMC cut tamarind tree