औरंगाबाद : महापालिकेत आढळले पुन्हा दांडीबहाद्दर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आयुक्‍तांच्या सततच्या दौऱ्यामुळे महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. सकाळी दहाच्या ठोक्‍याला अनेक कार्यालये ओस पडलेल्या अवस्थेत असतात. गुरुवारी (ता. आठ) महापौर नंदकुमार घोडेले यांनी सकाळी 10.30 ते 11 या वेळेत सात विभागांची पाहणी केली असता, तब्बल 50 जण गैरहजर आढळले. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिले आहे. 

औरंगाबाद - आयुक्‍तांच्या सततच्या दौऱ्यामुळे महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. सकाळी दहाच्या ठोक्‍याला अनेक कार्यालये ओस पडलेल्या अवस्थेत असतात. गुरुवारी (ता. आठ) महापौर नंदकुमार घोडेले यांनी सकाळी 10.30 ते 11 या वेळेत सात विभागांची पाहणी केली असता, तब्बल 50 जण गैरहजर आढळले. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिले आहे. 

महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे चित्र आहे. अधिकारी-कर्मचारी कधी येतात, कधी जातात याचा वेळच नाही. अनेक जण जेवणासाठी दुपारच्या वेळेत दोन-तीन तास गायब असतात. दुपारच्या वेळी विभागप्रमुखांनी कार्यालयात हजर राहावे, असे आदेश शेकडो वेळा काढण्यात आले. मात्र सकाळ, दुपारी अनेक विभागांत शुकशुकाटच असतो.

यापूर्वी अनेक महापौरांनी अचानक पाहणी करून झाडाझडती घेतली. त्या-त्यावेळी काहींच्या वेतनातून एका दिवसाची कपातही करण्यात आली. मात्र पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी सकाळी उपायुक्त महसूल, आस्थापना एक व दोन, लेखा, शिक्षण, विधी, एनयूएलएम, आरोग्य विभागाला सकाळी 10.30 ते 10.45 यावेळेत भेटी दिल्या. त्यात तब्बल 50 कर्मचारी गैरहजर आढळून आले. या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असे पत्र महापौरांनी दुपारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले. 
 
  
गैरहजर कर्मचारी 

  • उपायुक्त महसूल : फक्त तीन जण हजर 
  • आस्थापना एक : सात पैकी तीन हजर 
  • लेखा : 25 पैकी 12 हजर 
  • आस्थापना दोन : पाच पैकी एक हजर 
  • शिक्षण : 15 पैकी चार हजर 
  • विधी : सात पैकी चार हजर 
  • एनयूएलएम : 12 पैकी तीन हजर 
  • आरोग्य : 17 पैकी नऊ हजर 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AMC shirker staff