सिडको हडकोचे पाणी जाते कुठे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

शहरातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, नागरिक सातत्याने रस्त्यावर उतरत आहेत. विशेषतः सिडको-हडको भागात आठ-आठ दिवस पाणी येत
नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एक्‍स्प्रेस लाइनसाठी नक्षत्रवाडी येथून 51 एमएलडी पाणी निघते, मात्र सुमारे 20 एमएलडी पाणी मध्येच गायब होत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक पाहणी करणार आहेत. 

औरंगाबाद - शहरातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून, नागरिक सातत्याने रस्त्यावर उतरत आहेत. विशेषतः सिडको-हडको भागात आठ-आठ दिवस पाणी येत
नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एक्‍स्प्रेस लाइनसाठी नक्षत्रवाडी येथून 51 एमएलडी पाणी निघते, मात्र सुमारे 20 एमएलडी पाणी मध्येच गायब होत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक पाहणी करणार आहेत. 

भीषण दुष्काळामुळे शहर परिसरातील नागरिकांना बोअरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. मात्र जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे बोअर आटले असून, महापालिकेने किमान टॅंकरने तरी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करत दररोज मोर्चे काढले जात आहेत. टॅंकरच्या फेऱ्या वाढल्यामुळे शहरातील इतर भागांमध्ये पाण्याचा गॅप वाढला आहे. विशेषतः सिडको-हडको भागामधील नागरिक त्रस्त आहेत. आठ दिवसांनंतरही नळाला पाणी न आल्याने बुधवारी (ता. तीन) सिडको एन-पाच येथील टाकीच्या गेटला कुलूप ठोकण्यात आले होते. आंदोलनाचे सत्र थांबत नसल्यामुळे व ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांमध्ये रोष असल्याने महापालिकेतील सत्ताधारी त्रस्त आहेत.

गुरुवारी (ता. चार) महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांसोबत पाणीटंचाईवर चर्चा केली. याबाबत माहिती देताना महापौर म्हणाले, की सिडको-हडकोसाठी किमान 35 एमएलडी पाणी गरजेचे आहे. एक्‍स्प्रेस पाइपलाइनद्वारे नक्षत्रवाडी येथून 51 एमएलडी पाणी जाते. मात्र 30 ते 31 एमएलडीच पाणी पोचते. या लाइनवर अनेक ठिकाणी बायपास करून पाणी देण्यात आले आहे. त्यात शिवाजीनगर, पुंडलिकनगर, उल्कानगरी अशा भागांचा समावेश आहे. असे असले तरी 20 एमएलडी पाण्याचा गॅप येतोच कसा, याचा शोध घेण्याची सूचना आयुक्तांना करण्यात आली आहे. आयुक्त शुक्रवारी एक्‍स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार आहेत, असे घोडेले यांनी नमूद केले. 

गस्ती पथक करणार तयार 
आपल्या भागाला पाणी मिळवून घेण्यासाठी नगरसेवक टाकीवर जाऊन ठाण मांडत आहेत. काही ठिकाणी नागरिकांकडून लाइनमनला मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे गस्ती पथक तयार करून या पथकाद्वारे पाणीपुरवठ्यावर वॉच ठेवण्याच्या आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांनी होकार दिल्याचे महापौरांनी सांगितले. 

Web Title: AMC : Water shortage in CIDCO HUDCO