Video : अमेरिकेतील डॉक्टरने व्यक्त केली भारताबद्दल मोठी चिंता

दत्ता देशमुख
Wednesday, 8 April 2020

अमेरिकेसारख्या प्रगत देशातील वास्तव, वैद्यक क्षेत्रातील दांडगा अभ्यास आणि अनुभव, तसेच त्यांच्याच रुग्णालयातील कोरोनाबाधितांवरील उपचार आणि भारताची स्थिती याबद्दल त्यांनी खास ‘सकाळ’शी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितलेली परिस्थिती आणि सुचविलेले उपाय आपल्यासाठी लाखमोलाचे आहेत.
 

बीड : येथील मूळ रहिवासी असलेले, पण सध्या अमेरिकेत ओहायो राज्यातल्या टोलोडो शहरात स्थायिक झालेले डॉ. विठ्ठल शेंडगे यांनी भारतातल्या कोरोनाच्या स्थितीबद्दल मोठी चिंता व्यक्त केली आहे. अतिशय प्रगत अशा अमेरिकेची सध्याची झालेली हालत पाहता, भारताविषयी त्यांना काय भीती वाटते, ती त्यांनी एका व्हिडिओतून सांगितली आहे. 

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले डॉ. विठ्ठल शेंडगे व त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया या गेल्या २० वर्षांपासून इंग्लंड व अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतात अस्थिशल्यविशारद पदवीधारक डॉ. विठ्ठल शेंडगे यांनी इंग्लंड व अमेरिकेत चार वैद्यकीय अभ्यासक्रमांत पदव्युत्तर पदव्या मिळविल्या आहेत. १२ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. शेंडगे ओहायो राज्यातील टोलोडो शहरात वास्तव्यास असून, येथील अमेरिकन सरकारच्या रुग्णालयात सेवेतही आहेत. त्यांच्याच रुग्णालयात सध्या ४० कोरोनाबाधीत रुग्ण दाखल आहेत.

बीड जिल्ह्यातला कोरोनाचा रुग्ण या गावचा...

एकूणच अमेरिकेसारख्या प्रगत राज्यातील वास्तव, वैद्यक क्षेत्रातील दांडगा अभ्यास आणि अनुभव, तसेच त्यांच्याच रुग्णालयातील कोरोनाबाधितांवरील उपचार आणि भारताची स्थिती याबद्दल त्यांनी खास ‘सकाळ’शी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितलेली परिस्थिती आणि सुचविलेले उपाय आपल्यासाठी लाखमोलाचे आहेत.

अमेरिकेतील आपल्या रुग्णालयातून त्यांनी एक व्हिडिओ बनवून 'सकाळ'ला पाठवला आहे. त्यात, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सोशल डिस्टन्सिंग हेच भारतीयांकडे एकमेव शस्त्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वैद्यकीयसह सर्वच क्षेत्रांत प्रगत असलेल्या अमेरिकेत आज कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी लागणाऱ्या चाचणी आणि सुरक्षा किटचा मोठा तुटवडा आहे. साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारताची एकंदरीत परिस्थिती पाहता या संकटाचा भारत कसा मुकाबला करू शकेल, याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

डॉ. विठ्ठल शेंडगे म्हणतात.... 

  • अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातदेखील साडेतीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चाचणी करण्याच्या किटचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे भारतासाख्या देशाची तर मोठीच  काळजी वाटते. 
  • भारतात किट किती उपलब्ध आहेत, रुग्ण किती आहेत, प्रसार कसा होतोय हे शोधणे कठीण आहे. कारण कोव्हिड-१९ या विषाणूची लागण झाल्यापासून प्रत्यक्ष कळण्यासाठीच तीन दिवस लागतात.
  • अमेरिकेत सर्वत्र लॉकडाऊन नसतानाही अनेक राज्ये स्वतःहून लॉकडाऊन पाळत आहेत. आम्ही दोन आठवड्यांतून एकदाच अत्यावश्यक खरेदीसाठी बाहेर पडतो. भारत तर सोशल जगण्याची, एकत्रित राहण्याची सवय असलेल्या लोकांचा देश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे.
  • युरोप-अमेरिकेतील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आणि अद्याप तरी या आजारावर लस सापडलेली नसल्याने सोशल डिस्टन्सिंग हेच एकमेव शस्त्र भारतीयांजवळ आहे. एकमेकांचा संपर्क टाळा, मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये जाण्याचे टाळा. ‘स्टे होम, स्टे सेफ’ हे एकच शस्त्र घेऊन कोरोनाला हरवा, असे डॉ. शेंडगे यांनी आवर्जून सांगितले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American Indian Doctor Worried About India In Coronavirus Beed News