Vidhan Sabha 2019 : लोकसभेनंतर बदलले मतांचे गणित (वार्तापत्र : औरंगाबाद मध्य)

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना-भाजपची महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीचे उमेदवार अशा बदललेल्या राजकीय समीकरणात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होत आहे. वर्ष 2014 मध्ये भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे मैदानात होते. त्यावेळी एकूण 18 उमेदवार असल्याने मतविभाजनचा थेट फायदा एमआयएमला झाला होता. यंदा मात्र शिवसेना-भाजपमध्ये तशी मतविभाजनाची स्थिती नसल्याने "एमआयएम'साठी ही लढाई सोपी नाही. 

वर्ष 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वांना धक्का देत एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही एमआयएमने 26 जागांवर विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीतही मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांनी तब्बल 99
हजार 450 मते मिळविली; मात्र आता वंचित-एमआयएमची वाट वेगळी झाली. एमआयएमने नासेर सिद्दिकी तर वंचितने अमित भुईगळ यांना मैदानात उतरविले आहे. लोकसभेत मिळालेल्या मतांचा आकडा आता विधानसभा निवडणुकीत विभागला जाणार, हे निश्‍चित आहे. याचा फटका वंचित-एमआयएमच्याच उमेदवारांना बसण्याची शक्‍यता आहे. आता चौरंगी
लढत होत असल्याने वंचित आणि एमआयएम किती मते घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 2014 मध्ये इम्तियाज जलील यांना 61,843 मते मिळाली होती. याशिवाय प्रमुख पक्षांच्या नेत्यांनीही शहरात आपआपल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आहेत. या शिवाय भाकपचे ऍड. अभय टाकसाळ हेसुद्धा मैदानात आहेत. 
  
एमआयएमची वाढली डोकेदुखी 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटली आहे. राष्ट्रवादीने ऐनवेळी कदीर मौलाना यांचे नाव जाहीर केले. ते मैदानात असल्याने एमआयएमच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. कदीर मौलाना यांच्यामुळे मुस्लिम मते ही विभागली जाण्याची शक्‍यता आहे. शिवाय जावेद कुरैशी यांच्या नाराजीचासुद्धा फटका एमआयएमला बसेल; तसेच काही
मुस्लिम मते ही वंचित आघाडीकडेसुद्धा जाऊ शकतात. वर्ष 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विनोद पाटील यांना 11,842 तर कॉंग्रेसचे एम. एम. शेख यांना 9 हजार 93 मते मिळाली होती. हा आकडा 20 हजारांच्या घरात जातो. 

वर्ष 2014 पेक्षा वेगळी स्थिती 
शिवसेना-भाजप युतीने यावेळी पुन्हा प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत जैस्वाल आणि तनवाणी यांच्यातील मतविभागणीमुळे इम्तियाज जलील विजयी झाले होते; पण यंदा युतीकडून जैस्वालच मैदानात असल्याने त्यांना मतविभागणीची फारशी भीती नाही. वर्ष 2014 मध्ये प्रदीप जैस्वाल यांना 41,861 तर भाजपचे किशनचंद तनवाणी यांना 40,770 मते मिळाली होती. आता ही दोन्ही मते एकत्र केली तरी हा आकडा 81 हजारांचा होतो. त्यामुळे इतर उमेदवारांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com