esakal | परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू येथील एका ५५ वर्षीय महिलेचा अहवाल बुधवारी (ता.२९ एप्रिल २०२०) सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे नांदेड येथेच तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान ही  महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने परभणी जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : सेलू शहरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेले सर्वच्या सर्व ५१ स्वॅब निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता.एक मे) दिली. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.  

सेलू शहरातील एका परिसरात राहणारी 55 वर्षीय महिला दुर्धर आजाराने त्रस्त होती. ही महिला औरंगाबाद येथे २०१९ पासून एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु घेत होती. मात्र, २६ एप्रिल रोजी ही महिला उपचार घेऊन सेलूला परत आली. घरी दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला मंगळवारी (ता.२८ एप्रिल २०२०) परभणी येथील एका खासगी दवाखान्यात नेले. मात्र, तिची तब्येत गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला नातेवाइकांना दिला.

हेही वाचा -  महाराष्ट्राला हादरवणारी हिंगोली ब्रेकिंग : मालेगाव, मुंबईत ड्यूटी केलेल्या २५ जवानांना कोरोना

दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या महिलेला नातेवाइकांनी परभणीवरून थेट नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तिला भरती करून घेतले. तिच्या घशातील स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी (ता.२९ एप्रिल २०२०) सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे येथेच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने परभणी जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. 

सेलू शहरात ज्या भागात ती महिला राहत होती, तो परिसर तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी सील केला. तसेच गावात एक मेपर्यंत संचारबंदी लागू केली होती. परंतु,  ही महिला गुरुवारी (ता.३० एप्रिल २०२०) रात्री साडेदहा ते ११ वाजण्याच्या सुमारास मृत्यु पावली.

हे देखील वाचलेच पाहिजे - परभणीत २२७ जणांना घराबाहेर पडणे पडले महागात

दरम्यान ही महिला पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेले  सेलू शहरातील २७ व परभणी येथील खासगी रुग्णालयात संपर्कात आलेले २४ असे ५१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी (ता. एक मे २०२०) परभणी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, सर्वच्या सर्व स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 

loading image