अनंत भालेराव स्मृती पुरस्कार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित

Chandrakant Kulkarni
Chandrakant Kulkarni

औरंगाबाद : निर्भीड पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा 'अनंत भालेराव स्मृती पुरस्कार' यंदा सुप्रसिद्ध चित्रपट- नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे. औरंगाबाद येथे विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी (ता. 28) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रोख रू. 50 हजार, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चंद्रकांत कुलकर्णी हे मराठी रंगभूमी व चित्रपटांतील एक महत्त्वाचे नाव. ‘पौगंड’ हे नाटक त्यांनी 1988 ला दिग्दर्शित केले तेंव्हा पासून नुकतेच गाजत असलेले 2018ला रंगमंचावर आलेले ‘हॅम्लेट’ इथपर्यंतचा त्यांचा मराठी नाटकांचा दीर्घ असा प्रवास राहिलेला आहे. याकाळात त्यांनी ध्यानीमनी, डॉक्टर तुम्ही सुद्धा, चारचौघी, वाडा चिरेबंदी (नाट्यत्रयीचा एकमेवाद्वितीय मराठी प्रयोग), गांधी विरूद्ध गांधी, व्यक्ती आणि वल्ली अशी महत्त्वाची नाटके रंगभूमीला दिली. 1999 ला प्रदर्शित झालेल्या ‘बिनधास्त’ या रौप्यमहोत्सवी चित्रपटापसून त्यांची चंदेरी दुनियेची कारकीर्द सूरू झाली. समीक्षकांनी गौरविलेला ‘भेट’, सुवर्णमहोत्सव साजरा करणारा ‘काय द्याचं बोला’, संत तुकारामांवरचा ‘तुकाराम’ असे एकूण 11 चित्रपट त्यांचे पडद्यावर झळकले.  ‘पिंपळपान’, ‘टिकल ते पोलिटिकल’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ या दूरदर्शन मालिकाही त्यांच्या विशेष गाजल्या. मुळचे मराठवाड्याचे असलेले चंद्रकांत कुलकर्णी यांना राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय पुरस्कारांनी या पूर्वी गौरविण्यात आलेले आहे.   

अनंत भालेराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून अनंत भालेराव स्मृति पुरस्कार देण्याची सुरवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांना देण्यात आला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. तेंव्हापासून आजतागायत ही परंपरा चालू आहे. 

या पूर्वी कुमार केतकर, अरूण टिकेकर, पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार यांच्यासारखे नाटककार; मंगेश पाडगांवकर, ना.धो. महानोर यांसारखे प्रतिभावंत कवी, ग.प्र.प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, पुष्पा भावे, थोर गांधीवादी गंगाप्रसादजी अग्रवाल, नरेंद्र दाभोळकर ही सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठी माणसे, अनिल अवचट, हार्मोनिअम वादक अप्पा जळगांवकर, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह,  शिक्षणतज्ज्ञ द.ना.धनागरे यांच्यासारखा महनिय व्यक्तिमत्वांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

या वर्षीच्या पुरस्कारासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांची निवड एकमताने करण्यात आल्याचे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता पानट यांनी जाहिर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com