Latur News : पशुखाद्याचे दर वाढले, दुधाचे घटले

शेतीसह शेतीपूरक व्यवसायही शेतकऱ्यांना परवडेना
latur
latursakal

उजनी : उत्पादन खर्चात झालेली भरमसाट वाढ आणि त्या तुलनेत उत्पादनात झालेली घट यामुळे शेती परवडत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळल्याचे दिसून येतात. मात्र आता तोही व्यवसाय परवडत नसल्याचे शेतकऱ्यांची ओरड आहे. कारण पशुखाद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र दुधाच्या दरात घट होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीसह हा शेतीपूरक व्यवसायदेखील परवडत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प उत्पन्नाचे समीकरण केवळ शेतकऱ्यांसाठीच लागू असल्याची प्रचीती पुन्हा एकदा येत आहे. दुग्धव्यवसायासारखा उत्तम शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी आणेल असे वाटत असताना या व्यवसायालाही शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. न परवडणाऱ्या शेतीला दुग्धव्यवसाय एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत होता. त्यात ही सरकारने हस्तक्षेप करून दुधाचे दर कमी केले. त्याउलट जनावरांना लागणाऱ्या सुग्रास, मक्का भरडा, चारा (कडबा) आदी पशुखाद्याचे दर भरमसाट वाढवले आहेत.

शेतकऱ्यांना अनुदान मिळावे

दुधाचे दर कमी झाल्याने शासनाने सहकारी दूध संघात दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देणार असल्याचे सांगितले आहे. परंतु उजनी (ता.औसा) येथे किंवा या परिसरात कोठेही सहकारी दूध संघ उपलब्ध नाही. त्यामुळे येथील सर्व शेतकरी खासगी डेअरीला दूध देतात. सरकारच्या या निर्णयामुळे या अनुदानाचा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नुकसान सहन करावे लागत असलेल्या राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकरी पूर्णतः कोलमडला असून बाजारात त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने चीज होईल. दुधाला योग्य भाव मिळावा ही आमची मागणी आहे.

- अजिंक्य शिंदे, संचालक, दूध शीतकरण केंद्र, उजनी

दुग्धव्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. आम्ही दूध येथील खासगी डेअरीला देतो. ३.५ - ८.५ च्या दुधाला पूर्वी ३४ रुपये भाव मिळत होता. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर ३० रुपयांहून कमी झाले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय परवडत नाही. जनावरांना लागणारा हिरवा चारा, कडबा, सुग्रास, मक्का भरडा, आदी पशुखाद्याचे भाव वाढले आहेत.

- नागेश ढासले, शेतकरी, उजनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com