‘जनावरं खुट्यावर मरण्यापेक्षा विकलेली बरी’

प्रकाश बनकर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - गोवंशाचा आदर करा, गोवंश हत्या करू नका, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा, अशा सल्ल्यांचे डोस देणारे, गायींविषयी कळवळा व्यक्त करणारे सरकार खुट्यावरच पशुधन तडफडत असताना चारा छावण्या उभारण्यासाठी तत्परता का दाखवीत नाही, असा संतप्त सवाल बळिराजा उपस्थित करीत आहे. शासन दरबारातून फर्मान सुटल्यामुळे मंत्री दुष्काळाची पाहणी करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांची हतबलता दिसत नाही का? दुष्काळ जाहीर करण्याचे पारंपरिक मुहूर्त शोधण्यापेक्षा आता तो जाहीर करण्याची आवश्‍यकता आहे. आता चारा छावण्या उभारल्या नाहीत तर दावणीलाच जनावरे मरू देण्यापेक्षा ती विकण्याशिवाय हताश शेतकऱ्यांसमोर काहीच उरलेले नसेल.

शासन, राजकारणी केवळ दौरे करतात, दुष्काळावर ठोस उपाययोजना करीत नाहीत, असा आरोप शेतकरी करीत आहेत. तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक गेले, रब्बीचीही हीच स्थिती असल्यामुळे यंदाचा दुष्काळ दिवाळीपूर्वीच सुरू झाला आहे. मराठवाड्यात जिथे माणसांना पिण्याचे पाणी नाही, तिथे जनावरांचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. चारा-पाण्याआभावी खुट्यांवर असलेली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात आहेत. विक्रेतेही कवडीमोल दरात बैलांची खरेदी करीत असल्याचे चित्र मराठवाड्यात बघायला मिळत आहे. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी शासनातर्फे चारा छावण्या सुरू करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस पशुधनाचा प्रश्‍न गंभीर बनत असला तरीही शासन का पुढे येत नाही, असा भावनिक प्रश्‍न सिल्लोडचे शेतकरी समाधान शेलार यांनी उपस्थित केला. 

भाकड जनावरांची संख्याही वाढली
गोहत्याबंदी कायद्यानंतर भाकड जनावरे सांभाळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिथे शेतकऱ्यांच्या पिण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे तिथे भाकड जनावरे कशी संभाळावीत, तुम्हीच सांगा? असे प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

‘जनावरं सांभाळणं मोठं जिकिरीचं झालंय बघा’
दुधाळ जनावरं सांभाळणं मोठं जिकिरीचं झालंय बघा. माझ्याकडं एक गाय आहे. तिला दररोज ५० किलो चारा लागतो. यासाठी रोज दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येतो. यात दोन किलो ढेप, तीन किलो मक्‍याचा चुरा देतो. याचे योग्य नियोजन ठेवल्यामुळे गाय २५ लिटर दूध देते. मात्र, हे दूध २० रुपये लिटरनेच विक्री होते. साडेतीन हजार रुपये देऊन उसाचे वाढे विकत घेत ते खाऊ घालत आहे. महिन्याला दोन क्‍विंटल वाढे लागतात. सध्या वाढे मिळतात म्हणून गाय सांभाळतोय, चारा मिळणे अवघड झाल्यानंतर जनावरं विकावी लागणार. ही परिस्थिती सगळीकडेच आहे. शासन, राजकारणाऱ्यांनी याकडे लक्ष देत जनावरे खुट्यावर मरण्याआधीच उपाययोजना कराव्यात, असे वडोद बाजार येथील शेतकरी विष्णू कापसे यांनी सांगितले.

मंत्र्यांचे दौरे कशासाठी?
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत दुष्काळ आढावा घेतल्यावर आपल्या सहकारी मंत्र्यांना तालुक्‍यांत जाऊन पाहणी करण्याचे आदेश काढले आहे. या पाहणीला ‘खरीप हंगामातील टंचाईसदृश स्थितीची पाहणी’ असे नाव दिले आहे. त्यानुसार राज्यात मंत्र्यांनी दौरे सुरू केले आहेत. मराठवाड्यात दहा मंत्र्यांवर प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते केवळ पीक पाहणी करीत आहेत. चारा-पाण्याअभावी जनावरांची आतापासूनच सुरू झालेली तडफड शेतकरी त्यांच्यासमोर मांडतोय. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी आवश्‍यक उपाययोजनाही तातडीने सुरू करण्याची गरज आहे. त्यात चारा छावण्यांची तातडीने दखल घ्यायला हवी, असे शेतकरी सांगत आहेत.

Web Title: Animal Sailing by farmer