गोठ्याला आग लागल्याने जनावरे होरपळली, कुठे ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात नांदापूर येथे शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागून एक गाय व एक गोऱ्या दगावला, तर पाच गायी भाजल्या व शेती साहित्य जळून खाक झाले. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 

हिंगोली ः नांदापूर (ता. कळमुनरी) येथे सोमवारी (ता. चार) दुपारी दोनच्या सुमारास अचानक शेतातील गोठ्याला आग लागून गोठ्यात असलेल्या दहा ते बारा जनावरांपैकी एक गाय व एक गोऱ्या दगावला असून पाच ते सहा गायी भाजल्या गेल्या आहेत. घटनास्‍थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्‍यात आणली. तोपर्यंत शेतकऱ्याचे अंदाजे एक लाखाच्या वर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

कळमनुरी तालुक्‍यातील नांदापूर येथील शेतकरी मधुकर काशिराव बोरकर यांचे गावाजवळ शेत आहे. शेतात आखाडा असून या आखाड्यावर त्‍यांनी त्‍यांच्याकडे असलेली दहा ते बारा जनावरे बांधली होती. 

हेही वाचा - खरबुज, शेवगा लागवडीचा उत्पादन खर्चही निघेना, काय कारण ते वाचा... -

विद्युत पंप सुरू करून पाणी ओतले
सकाळी त्‍यांनी या जनावरांना चारा - पाणी करून ते घरी आले होते. त्‍यांनतर दुपारी दोनच्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागल्याची माहिती त्‍यांना मोबाइलवर शेजाऱ्यांनी दिली. त्‍यांनी काही गावकऱ्यांना शेताकडे घेत घटनास्‍थळी धाव घेतली. त्‍यानंतर विद्युत पंप सुरू करून आगीवर पाणी ओतने सुरू केले. आत बांधलेली जनावरे मात्र घाबरून गेली होती.

हेही वाचा - नियम मोडणाऱ्यांना दंड तर काही प्रकरणात गुन्हे, कुठे आणि का ते वाचा...

आगीचे नेमके कारण कळू शकले नाही  
काही जनावरांनी बांधलेली दावे तोडून पळ काढली. मात्र, ज्यांची दावे तुटली नाहीत त्या पाच गायी भाजल्या गेल्या, तर एक गाय व एक गोरा दगावला आहे. तसेच गोठ्यात असलेले शेती साहित्य, जनावरांची वैरण, टीनपत्रे जळून अंदाजे एक लाखाच्यावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 

उष्णतेमुळे आगीच्या घटनेत वाढ 
जिल्‍ह्यात उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने दुपारच्या वेळी वाढलेल्या उष्णतेमुळे आगीच्या घटना घडत आहेत. एप्रिलमध्ये एक तर मे महिण्यात (ता.चार) पर्यंत तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील करंजाळातांडा येथील एका गोठ्याला बुधवारी (ता.२९) एप्रिलला अचानक आग लागल्याने शेती साहित्यासह टिनपत्राचे अंदाजे सत्तर हजाराचे नुकसान झाले होते. तसेच कळमनुरी येथील चौक बाजारात असलेल्या एका किराणा दुकानाला शुक्रवारी (ता.एक) मध्यरात्रीला आग लागून जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Animals Ran Away Due To The Fire In The Barn, Read Where, Hingoli News