खरबुज, शेवगा लागवडीचा उत्पादन खर्चही निघेना, काय कारण ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथील शेतकऱ्याने दोन एकरांत खरबुजाचे पीक घेतले आहे. मात्र, गावबंदी, सीमाबंदीमुळे विक्रीच्या अडचणी येत असल्याने वेलालाच हे पीक सडून जात असल्याने उत्‍पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तर औंढा नागनाथ परिसरातील एका शेतकऱ्याने शेवग्याची लागवड केली. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत बाराही महिने चढ्या भावाने विकणाऱ्या शेवग्याच्या शेंगांची या वर्षी मात्र ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीमुळे विक्रीसाठी फटका बसला आहे. 

केंद्रा बुद्रुक ः सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथील शेतकऱ्याने दोन एकरांत खरबुजाचे पीक घेतले आहे. मात्र, गावबंदी, सीमाबंदीमुळे विक्रीच्या अडचणी येत असल्याने वेलालाच हे पीक सडून जात असल्याने उत्‍पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

सेनगाव तालुक्‍यातील बटवाडी येथील शेतकरी देवबा झाडे यांनी पारंपरिक शेती उत्‍पादनात बदल म्हणून दोन एकरांत खरबुजाचे पीक घेतले आहे. लॉकडाउनमुळे या पिकाची बाजारात विक्री करण्याच्या अडचणी येत आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार बंद असल्याने कोणत्याही बाजारात खरबूज विक्रीसाठी नेता येईनात, तसेच जिल्‍ह्याच्या सीमादेखील बंद असून अनेक गावांतदेखील गावबंदी करण्यात आल्याने शेतकऱ्याची कोंडी झाली आहे. त्‍याचा परिणाम खरबुजांच्या विक्रीवर झाला आहे.

हेही वाचा - नियम मोडणाऱ्यांना दंड तर काही प्रकरणात गुन्हे, कुठे आणि का ते वाचा...

तोडणीच बंद केल्याने नुकसान 

शेतकऱ्यांनी खरबुजांची तोडणीच बंद केल्याने ती वेलालाच सडून जात आहेत. श्री. झाडे यांच्याकडे पाण्याची सुविधा असल्याने त्यांनी दोन एकरांत खरबूज लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. यातून चांगले उत्‍पन्न मिळेल अशी अपेक्षा व्यक्‍त केली होती. श्री. झाडे यांनी लागवडीपासून आतापर्यंत पन्नास हजार रुपये खर्च केला आहे.

हेही वाचा - आता वैद्यकीय अधिकारी, आरआरटी पथकामार्फत तपासणी, कुठे ते वाचा...

दुचाकी, सायकल व डोक्‍यावर घेऊन विक्री
सध्या रमजान महिणा असल्याने खरबुजाला चांगली मागणी आहे. परंतु, त्‍याची विक्री करण्यास अडचणी येत आहेत. सर्वत्र ‘कोरोना’ने थैमान घातल्याने सुरू असलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचा फटका खरबूज विक्रीला बसला आहे. यातून शेतकऱ्यांनी मार्ग काढत दुचाकी, सायकल व डोक्‍यावर घेऊन काही ठिकाणी त्‍याची विक्री करणे सुरू केले आहे. मात्र, दरवर्षी व्यापारी जागेवरूनच त्‍याची खरेदी करतात. या वर्षी तसे झाले नसल्याने अडचणी आहेत. परंतु, एकाच वेळी खरबूज काढणीला येत असल्याने त्‍याची विक्री मात्र त्‍या प्रमाणात होत नसल्याने जागेवर ते सडून जात आहेत. यासाठी झालेला खर्चदेखील अद्याप निघालेला नाही. आता दिवसाआड सुरू झालेल्या बाजाराचा उपयोग थोड्याफार प्रमाणात होणार असल्याची अपेक्षा श्री. झाडे यांना आहे.

शेवगा लागवडीचा खर्चही निघेना
औंढा नागनाथ ः पूर्वीपासून मधुमेहासारख्या दुर्धर आजारावर औषध म्हणून ओळख असणारी शेंगभाजी म्हणजे शेवगा. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत बाराही महिने चढ्या भावाने विकणाऱ्या शेवग्याच्या शेंगांची या वर्षी मात्र ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीमुळे विक्रीसाठी फटका बसला आहे.

शेतात २५ शेवग्याच्या झाडांची लागवड
औंढा येथील शेतकरी रावसाहेब देशमुख यांनी पारंपरिक शेतीला बगल देत काहीतरी नवीन करण्याच्या प्रेरणेने त्यांच्या शेतात २५ शेवग्याच्या झाडांची लागवड केली. या वर्षी फेब्रुवारीपासून शेंगांची बाग भरून आली होती. सुरवातीला थोडे दिवस २५ ते ३० रुपये किलोप्रमाणे शेवग्याची बाजारामध्ये विक्री झाली. आठवड्याला बऱ्यापैकी शेंगा झाडाला निघत होत्या. खर्च जाऊन चांगले उत्पन्न होईल, अशी आशा रावसाहेब देशमुख यांना होती. 

हंगामात दोन लाख रुपयांचे नुकसान 
तोडणीच्या वेळेस ‘कोरोना’चे संकट आले. संचारबंदी लागू करण्यात आल्याने शेंगा तोंडून बाजारात त्‍याची विक्री कशी करावी, असा प्रश्न पडल्याने श्री. देशमुख यांनी शेवग्याची तोडणी केली नाही. त्यामुळे शेंगांचे आकार आणि वजन वाढू लागले. परिणामी झाडाला ओझे होऊन अगोदरच कुचकी असलेली शेवग्याची झाडे मोडू लागली म्हणून शेंगा तोडून शेतातच पसरड टाकायची दुर्दैवी वेळ आली. त्यामुळे शेवगा पिकासाठी केलेला खर्च आणि मेहनत वाया गेली असून हंगामात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दोन एकरांत खरबुजाची लागवड

दोन एकरांत खरबुजाची लागवड केली आहे. सध्या ते तोडणीला आली आहेत. मात्र, लॉकडाउन आणी संचारबंदीचा फटका खरबूज विक्रीला बसल्याने आर्थिक अडचण आली आहे.
- देवबा झाडे, खरबूज उत्‍पादक शेतकरी. 

शेंगा तोडून टाकण्याची वेळ

झाडे मोडु लागल्याने शेतातच शेंगा तोडून टाकण्याची वेळ आली आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केला आहे. आठवड्याला बऱ्यापैकी शेंगाही निघाल्या. त्‍यामुळे दोन लाखांचे उत्पन्न हाती पडणार होते. मात्र, ‘कोरोना’मुळे आर्थिक नुकसान होऊन अपेक्षाभंग झाला.
- रावसाहेब देशमुख, शेतकरी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Production Cost Of Melon And Sugarcane Cultivation Did Not Go Up, Why Read It, hingoli news