esakal | नियम मोडणाऱ्यांना दंड तर काही प्रकरणात गुन्हे, कुठे आणि का ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1

हिंगोली ः जिल्ह्यात ‘कोरोना’च्या लॉकडाउनमध्ये पोलिस प्रशासन नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहे. यामध्ये अवैध दारु विक्री, मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे तसेच पत्ते, जुगार खेळणे यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात रविवारी (ता.तीन) व सोमवारी (ता.चार) झालेल्या सर्व कारवाईचा एकत्रित घेतलेला हा आढावा.  

नियम मोडणाऱ्यांना दंड तर काही प्रकरणात गुन्हे, कुठे आणि का ते वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सवना येथे हातभट्टी दारूचे अड्डे केले उद्‍ध्वस्त
हिंगोली ः सेनगाव तालुक्‍यातील गोरेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सवना येथे सोमवारी (ता.चार) हातभट्टी दारूचे अंदाजे बाराशे लिटर रसायन उद्‍ध्वस्त करण्यात आले आहे.
सध्या लॉकडाउन असल्यामुळे ग्रामीण भागातील तांडा, वस्त्यांवर हातभट्टी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळत आहे. तसेच हातभट्टी दारूचे भावदेखील भडकले आहेत. सध्या जिल्‍ह्यात देशी विदेशी दारूची दुकाने उघडलेली नाहीत. त्‍यामुळे हातभट्टीला मागणी वाढत आहे. त्‍यामुळे एका बिस्लरीला चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागत असल्याने हातभट्टी दारुवाल्यांची दिवाळीच सुरू आहे. दरम्‍यान, सोमवारी गोरेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, पोलिस उपनिरीक्षक श्री. पाटील, विजय महाले यांनी सवना तांडा येथील युवकांच्या व पोलिस पाटील यांच्या मदतीने जवळपास बाराशे लिटर हातभट्टी रसायन व हातभट्टीचे अड्डे उद्‍ध्वस्त केले आहेत. 

हेही वाचा - Video : ४५ हजारांची हातभट्टी दारू नष्ट; महिलेवर गुन्हा : वाचा कुठे?

मास्क न लावणाऱ्यांना तेरा हजाराचा दंड
आखाडा बाळापुर ः मास्क न लावता बाजारपेठेत गर्दी करून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्‍यांच्याकडून १३ हजारांचा दंड सोमवारी (ता.चार) वसूल केला. येथे पाच दिवसानंतर सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत बाजारपेठ सुरू झाल्याने खरेदीसाठी गर्दी झाली होती. दरम्यान, दुकानांवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक होते. मात्र, अनेकांनी मास्क न लावता बाजारपेठेत प्रवेश केल्याने पोलिसांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, उपनिरीक्षक हनुमंत नखाते, जमादार संजय मार्के, राजू जाधव, बाबुराव चव्हाण, श्री.नागरे तसेच ग्रामविकास अधिकारी राजू घुगे, ग्रामपंचायत कर्मचारी शंकर सूर्यवंशी, शेख अन्वर, रामा सूर्यवंशी, श्री.बोंढारे यांनी अनेकांवर कारवाई करून १३ हजारांचा दंड वसूल केला. यापुढे तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक श्री. हुंडेकर यांनी दिला.

हेही वाचा - परभणी जिल्ह्याच्या सीमेवर ११ लाखाची रोकड जप्त

गिरगावात जुगार खेळणाऱ्यांकडून ८१ हजारांचा ऐवज जप्त
गिरगाव ः वसमत तालुक्‍यातील गिरगाव येथे जुगार खेळणाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य, नगदी रोकड व तीन मोटार सायकल असा एकूण ८१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ जणांवर रविवारी (ता.तीन) गुन्हा दाखल करण्यात आला. गिरगाव शिवारातील हफीज अली दर्गाच्या पडीत जमिनीवर लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत रविवारी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना कळतात त्‍यांनी घटनास्‍थळी भेट देत ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खळेत व खेळवित असताना नगदी रुपये व जुगाराचे साहित्य, तीन मोटार सायकल असा एकून ८१ हजार २५० रुपयांचा ऐवज सापडला. या प्रकरणी सय्यद मुजाहीद, सोनाजी बारसे, मोहमद इलियास, शिवाजी अन्नपुर्णे, फेरोज कुरेशी, आसेफ कुरेशी, महेबुब कुरेशी, अप्पू शेख (सर्व रा.गिरगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

loading image