पप्पा परत या...निबंधाने आणले डोळ्यांत पाणी, धनंजय मुंडेंकडून मदतीची घोषणा 

दत्ता देशमुख
रविवार, 19 जानेवारी 2020

बीड - कोवळ्या वयातच डोक्‍यावरून बापाचं छत्र हरपलं. बालहट्ट अर्धवटच राहिले. अशातच योगायोगाने शाळेत "बाप' विषयावर निबंध लिहिण्याची वेळ मंगेश वाळके या चिमुकल्यावर आली. त्याने "पप्पा परत या' हा निबंध लिहिला. हा निबंध नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला अन्‌ अनेकांचे डोळे पाणावले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत या विभागातून मंगेशच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा केली आहे. 

बीड - कोवळ्या वयातच डोक्‍यावरून बापाचं छत्र हरपलं. बालहट्ट अर्धवटच राहिले. अशातच योगायोगाने शाळेत "बाप' विषयावर निबंध लिहिण्याची वेळ मंगेश वाळके या चिमुकल्यावर आली. त्याने "पप्पा परत या' हा निबंध लिहिला. हा निबंध नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला अन्‌ अनेकांचे डोळे पाणावले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत या विभागातून मंगेशच्या कुटुंबीयांसाठी मदतीची घोषणा केली आहे. 

आष्टी तालुक्‍यातील देवीनिमगाव येथील वाळके वस्तीवरील परमेश्वर वाळके यांचा मंगेश हा दहा वर्षांचा मुलगा. परमेश्वर वाळके यांचे क्षयरोगाने निधन झाले. गवंड्याच्या हाताखाली काम करणारे परमेश्वर वाळके हे गरीब परिस्थिती असली तरी मंगेशचे ऐपतीप्रमाणे लाड करीत; परंतु त्यांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले. विषाणूची बाधा छोट्या मंगेशला होऊ नये यासाठी त्याला आजोळी पाठविण्यात आले. त्यानंतर परमेश्वर वाळके यांचे निधन झाले. त्यामुळे या कुटुंबाला मोठा धक्का बसला. दरम्यान, मंगेश पुन्हा नियमित शाळेत जाऊ लागला.

हेही वाचा - वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी

चाचणी परीक्षेत शिक्षकांनी "वडील' विषयावर निबंध लिहायला लावला. नंतर हाच निबंध सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंगेशच्या वडिलांविषयीच्या भावना आणि संवेदनशीलता यातून समोर आली. वडील गेल्यानंतर मंगेशने स्वतःच्या वेदनांना निबंधातून वाट मोकळी करून दिली. त्याच्या शिक्षिकेने जेव्हा मंगेशने लिहिलेला निबंध वाचला, तेव्हा त्यांनाही रडू आवरले नाही. त्याचे दुःख वाचून लोकही हळहळ व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा - बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार, संजय दाैंड बिनविरोध

असा आहे निबंध 
माझे नाव मंगेश. माझ्या पप्पांचे नाव परमेश्‍वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करीत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा 18 तारखेला वारले. माझी मम्मी खूप रडली. मीबी लई रडलो. तेव्हा आमच्या घरी पाव्हणे आले होते.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

माझे पप्पा खूप मायाळू होते. ते म्हणायचे मंगेश तू शिकून मोठा साहेब हो. पप्पा घरात नसल्यावर कोणीच कोणाला मदत करीत नाही. त्यांनी एकदा खोल पाण्यातून आमच्या गाईला काढले. मला पप्पांची आठवण येते. रात्रीच्याला आम्हाला चोरांची भीती वाटते. पप्पा तुम्ही लवकर परत या. 

मंत्री मुंडेंकडून दखल 
सोशल मीडियावरील या निबंधाची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली आहे. मंगेशच्या परिवाराला सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याण निधीतून अर्थसाह्य देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याच्या वडिलांचे छत्र हरपले असून आई दिव्यांग आहे. दिव्यांग बीजभांडवल योजनेअंतर्गत दीड लाख रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थसाह्य, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष पाच टक्के बस पास व इतर योजना देण्याची घोषणा मुंडेंनी करीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement Of Help From Dhananjay Munde